'गडकरी'मध्ये नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार राहुल चोपडा

 'गडकरी' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर, टिझर झळकल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती ती, नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याची. 

Updated: Oct 13, 2023, 02:04 PM IST
'गडकरी'मध्ये नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार राहुल चोपडा  title=

मुंबई : ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित 'गडकरी' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर, टिझर झळकल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती ती, नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याची. आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टर झळकले असून यातील 'गडकरी' यांचा चेहरा समोर आला आहे. नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा साकारणार आहेत. 

तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारणार आहे. या व्यतिरिक्त या चित्रपटात नितीन गडकरी यांच्या मित्रांच्या भूमिकेत अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख दिसतील तर पत्रकाराची भूमिका तृप्ती प्रमिला केळकर हिने साकारली आहे. अनुराग राजन भुसारी दिग्दर्शित 'गडकरी' हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'गडकरी'ची कथा, पटकथाही अनुराग राजन भुसारी यांची असून अनुराग भुसारी, मिहिर फाटे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 

 चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग राजन भुसारी म्हणतात, '' हा चित्रपट अशा एका व्यक्तिमत्वावर आधारित आहे, ज्याचे कर्तृत्व केवळ भारतापुरताच मर्यादित नसून त्याची दखल भारताबाहेरही घेण्यात आली आहे. असे व्यक्तिमत्व कसे घडले, हे 'गडकरी'मधून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. मुळात त्यांच्या रक्तातच समाजसेवा होती, तरी त्यांच्या या कारकिर्दीत त्यांच्या मित्रांचा आणि त्यांच्या अर्धांगिनीचा तितकाच सहभाग होता. 

कलाकारांच्या निवडीबद्दल सांगायचे तर राहुल चोपडा या भूमिकेत चपखल बसतात. त्यांची देहबोली, संयमी स्वभाव, कठोर तरीही प्रसंगी हळवे मन या विविध छटा राहुल चोपडा यांनी उत्तम साकारल्या आहेत. तर समंजस, खंबीरपणे पतीच्या पाठीमागे उभ्या राहणाऱ्या कांचनताईही ऐश्वर्या यांनी सुरेख साकारली आहे. यातील प्रत्येक पात्र जसेच्या तसे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.'