रजनीकांत CM योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडले, विश्वास बसत नसेल तर VIDEO पाहा

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेतली. यावेळी रजनीकांत योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडले. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांचा विश्वासच बसत नाही आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 20, 2023, 10:44 AM IST
रजनीकांत CM योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडले, विश्वास बसत नसेल तर VIDEO पाहा title=

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या 'जेलर' चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहे. जेलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली असून, अद्यापही यशस्वी वाटचाल सुरु आहे. यादरम्यान, रजनीकांत वेगवेगळ्या राज्यांचा दौरा करत असल्याचा दिसत आहेत. नुकतंच रजनीकांत आपल्या चित्रपटाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात पोहोचले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी एकत्र चित्रपट पाहिला. पण दोघांची ही भेट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

रजनीकांत 'जेलर' चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत पोहोचले होते. रजनीकांत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर योगी आदित्यनाथ त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. यावेळी गाडीतून उतरल्यानंतर रजनीकांत योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडले. योगी आदित्यनाथ यांच्या तुलनेत रजनीकांत वयाने मोठे असल्याने त्यांनी पाया पडणं अनेकांसाठी भुवया उंचावणारं ठरलं आहे. रजनीकांत योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांचा विश्वासच बसत नाही आहे. 

पाहा व्हिडीओ

रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यासह जेलर चित्रपट पाहिला. दरम्यान उत्तर प्रदेशला रवाना होण्याआधी त्यांनी ANI शी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, "मी मुख्यमंत्र्यांसह चित्रपट पाहणार आहे. हा चित्रपट यशस्वी होणं माझ्यासाठी आशीर्वादाप्रमाणे आहे".

याआधी लखनऊत जेलर चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी उपस्थिती लावली. आपल्याला रजनीकांत यांचा अभिनय फार आवडला, आपल्याला मजा आली असं त्यांनी सांगितलं. "मला जेलर चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. रजनीकांत यांचे अनेक चित्रपट मी पाहिले आहेत. ते एक वेगळंच रसायन आहे. चित्रपटात कंटेंट कमी असला तरी त्यांचा अभिनय सर्व कसर भरुन काढतो," असं ते म्हणाले.

योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर रजनीकांत रविवारी अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. उत्तर प्रदेशात येण्यापूर्वी रजनीकांत झारखंडमध्ये होते, जिथे त्यांनी प्रसिद्ध छिन्नमस्ता मंदिराला भेट दिली आणि झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवनात भेट घेतली.

जेलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. फक्त 8 दिवसांत चित्रपटाने 235.65 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट नेल्सनने दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात रजनीकांत यांच्यासह प्रियंका मोहन, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, योगीबाबू, वसंत रवी आणि विनायकन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.