...म्हणून रानू मंडल यांच्या मुलीला धमकी; तिचा मोठा खुलासा

रानू स्टेशनवर गातात हे आपल्याला.... 

Updated: Sep 4, 2019, 03:27 PM IST
...म्हणून रानू मंडल यांच्या मुलीला धमकी; तिचा मोठा खुलासा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल  झाला. या व्हिडिओमध्ये रानाघाट रेल्वे स्थानकावर एक महिला लता मंगेशकर यांनी गायलेलं 'एक प्यार का नगमा है' हे गाणं गाताना दिसली. या महिलेला आवाज पाहता, जणू ही काही दैवी देणगीच आहे, असं म्हणत प्रत्येकाने त्यांची प्रशंसा केली. अवघ्या काही तासांमध्ये व्हायरल झालेल्या या व्हिडिओच्या निमित्ताने रानू मंडल या अशा काही प्रसिद्धीझोतात आल्या की, रातोरात नशीब बदलणं म्हणजे नेमकं काय... याचं उदाहरणच सर्वांना मिळालं. 

मुख्य म्हणजे रानू मंडल या प्रसिद्धीझोतात येताच संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाने त्यांना गाण्याची संधी दिली. ज्यानंतर रानू यांच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. इतकच नव्हे, तर त्यांच्या मुलीविषयीही काही माहिती समोर आली. पण, आता त्यांच्या मुली़कडून म्हणजे एलिझाबेथ साथी रॉय यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रानू स्टेशनवर गातात हे आपल्याला ठाऊकही नव्हतं असा खुलासा त्यांच्या मुलीने केला. 

'आएएनएस'शी संवाद साधत असताना आपली आई, म्हणजेच रानू यांचं मानसिक संतुलन ठीक नसल्याचंही एलिझाबेथने सांगितलं. एके दिवशी आई रेल्वे स्थानकावर गाताना दिसली त्यावेळी तिने दोनशे रुपयेत देत त्यांना घरी जाण्यास सांगितलं. इतकच नव्हे तर, आपण ओळखीच्या एखाद्या व्यक्तीकडून त्यांच्यासाठी दरमहा पाचशे रुपये पाठवत असल्याची बाबही तिने समोर आणली. 

एकीकडे रानू यांची परिस्थिती समोर आली तेव्हा त्यांच्या मुलीकडूनं सांभाळ केला जात नसल्याची बाबही समोर आली. ज्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या मुलीवर तीव्र नाराजीचा सूर आळवला. पण, परिस्थिती नेमकी काय आहे हेच रानू यांची मुलगी समोर आणत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपण घटस्फोटीत असून, मुलांचा सांभाळ करण्याचीही जबाबदारी आपल्यावर आहे. अशातच रानू यांनी आपल्यासोबत राहण्यास नकार दिल्याचं त्यांच्या मुलीचं म्हणणं आहे. 

एलिझाबेथने दिलेल्या माहितीनुसार रानू यांची दोन लग्न झाली आहेत. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पहिल्या पतीचं निधन झालं. तर, त्यांचा दुसरा पती अजूनही हयात आहे. रानू यांना एकूण चार मुलं आहेत. जेथे रानू यांची तीन मुलं त्यांची काळजी घेण्यासाठी पुढेली आली नाहीत, तिथेच आपण मात्र रानू यांच्यासाठी पुढे येऊनही होणारी टीका पाहता एलिझाबेथने नाराजी व्यक्त केली. 

रानू यांच्या मॅनेजरकडून धमकी

रानू यांचा व्हिडिओ सर्वप्रथम सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या अतिंद्र चक्रवर्ती या युवकाला त्यांच्या लोकप्रियतेचं श्रेय देण्यात येत आहे. सध्या अतिंद्रच रानू यांचा मॅनेजर असल्याचं कळत आहे. अतिंद्र आणि तपन या दोन व्यक्तींनी इतरांची मदत आपल्याला धमकावल्याचा धक्कादायक खुलासा एलिझाबेथने दिला. आईशी (रानू यांच्याशी) कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केल्यात हात- पाय तोडण्यात येतील अशी धमकी दिल्याचं एलिझाबेथने उघड केलं. ते दोघंही रानू यांच्या मनात आपल्याविषयी रोष पेरत असल्याचा दावा एलिझाबेथने केला. आपण हतबल असल्याचं म्हणत या परिस्थितीत कोणतीही ठाम भूमिका घेता येणार नाही, कारण त्याचे थेट परिणाम आईवर होतील ही बाब अधोरेखित करत एलिझाबेथने तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.