मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि संस्कारी बाबूजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलोकनाथ यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे. कारण, जवळपास ४० दिवसांपूर्वी विनता नंदा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता आलोकनाथ यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. #MeToo या चळवळीमध्येच नंदा यांनी आपल्यासोबत घडलेल्या त्या प्रसंगाविषयी वाच्यता केली होती.
बलात्काराच्या आरोपाखाली त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांतील अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार ओशिवरा पोलीस स्थानकात भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम ३७६ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Police Additional CP Manoj Sharma says 'Oshiwara Police has registered an FIR against Alok Nath under section 376 of IPC (rape) on the complaint filed by Writer Vinta Nanda.' pic.twitter.com/m7A99o61Xt
— ANI (@ANI) November 21, 2018
टेलिव्हिजन शो 'तारा' च्या निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी काही दिवसांपूर्वी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून नाव न घेता आलोकनाथ यांचं खरं रुप सर्वांसमोर आणलं होतं.
'जेव्हा मी १९९४ मध्ये 'तारा' या मालिकेसाठी लिहीत होते आणि त्या मालिकेच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळत होत, तेव्हा माझ्यासोबत शारीरिक दुर्व्यवहार करण्यात आला होता', असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
दरम्यान, विनता यांनी आरोप केल्यानंतर इतरही काही अभिनेत्रींनी आलोकनाथ यांच्या वागण्याविषयीचे गौप्यस्फोट केल्याचं पाहायला मिळालं होतं. आपल्यावर करण्यात आलेले हे सर्व आरोप आलोकनाथ यांनी फेटाळून लावले होते. पण, आता मात्र ते या साऱ्यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.