close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आवड म्हणून नव्हे, तर या कारणामुळे सायकल चालवतो सलमान

वांद्रे येथे तो अनेकदा सायकल चालवताना दिसतो 

Updated: Sep 24, 2019, 06:12 PM IST
आवड म्हणून नव्हे, तर या कारणामुळे सायकल चालवतो सलमान
सलमान खान

मुंबई : अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. सलमान येत्या काळात 'दबंग' या त्याच्या प्रचंड गाजलेल्या चित्रपटाच्या तिसऱ्या भागातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दबंग ३'सोबतच तो छोट्या पडद्यावरही प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. 

'बिग बॉस' या वादग्रस्त कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा पुन्हा एकदा सलमानच्या खांद्यांवर आहे. मुख्य म्हणजे या कार्यक्रमाच्या यंदाच्या पर्वाचा सेट हा मुंबईतच असल्यामुळे विविध चित्रीकरणांमध्ये व्यग्र असणाऱ्या सलमानसाठी ही एक सुखावणारी बाब आहे. ज्यामुळे कामाच्या व्यापातून कुटुंबाला आणि सायकलस्वारीलाही आता तो वेळ देऊ शकणार आहे. बरं आता सायकलस्वारीचा विषय निघाला आहे, तर याविषयी सलमानने एक महत्त्वाची बाब सर्वांसमोर आणली. 

मुंबईच्या वांद्रे परिसरात राहणाऱ्या सलमानच्या अधिकाधिक चित्रपटांचं चित्रीकरण हे वांद्र्यातीलच मेहबूब स्टुडिओमध्ये किंवा गोरेगाव येथे असणाऱ्या चित्रनगरीमध्ये होतं. सलमानच्या घरापासून चित्रनगरीपर्यंतचं अंतर हे जवळपास १८ ते २० किलोमीटर इतकं आहे. पण यातही सलमानला वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो. अनेकदा तर, चित्रीकरणासाठी वेळेत पोहोचण्यासाठी म्हणून सलमानला घरातून सकाळी चार वाजण्याच्याही आधी निघावं लागतं. नाहीतर वाहतूक कोंडीतच त्याचा जास्त वेळ वाया जातो. 

दैनंदिन जीवनातील याच समस्येवर तोडगा म्हणून हा 'दबंग खान', सायकल चालवतो. 'झी न्यूज'शी बोलताना खुद्द सलमाननेच याविषयीचा सल्ला देत ही बाब उघड केली. तुम्हाला तुमच्या निर्धारित ठिकाणी पोहोचण्यासाठी तीन मार्गांचा वापर करता येऊ शकतो. सायकल चालवा, पायी जा किंवा मग, रेल्वेचा वापर करा. 

स्वत: सलमान अनेकदा त्याच्या वांद्रे येथील घरापासून गोरेगाव चित्रनगरीपर्यंत सायकलनेही जातो. १८ ते २० किमी. पर्यंतचं हे अंतर पार करण्यासाठी त्याला ५० ते ६० मिनिटांचा काळ लागतो. तर, हेच अंतर कारने गेल्यास त्याला दोन तासांहून अधिक वेळ व्यतीत करावा लागतो. 

वाहतुक कोंडीकडे एक मोठी समस्या म्हणून पाहणारा सलमान हा मेट्रो ट्रेनचंही समर्थन करतो. एका कार्यक्रमादरम्यानच त्याने याविषयी आपले विचार मांडले. स्वत:चा अनुभव शेअर करत मेट्रो चांगली असल्याचं त्याने सांगितलं. मेट्रोचं इंटेरियर चांगलं असल्याचं सांगत किमान इथे लोकं बाहेर लटकत नाही जे सुरक्षेच्या दष्टीने अत्यंत महत्त्वाचं असल्याचंही त्याने अधोरेखित केलं.