मुंबई : दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) हिने काही दिवसांपूर्वी काश्मिरी पंडितांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. या विधानानंतर सर्वंच स्तरातून तिच्यावर टीका होत होती. आता याच विधानावर तिने स्पष्टीकरण दिले. साई पल्लवीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.
चर्चेतलं वक्तव्य
साई पल्लवी आगामी चित्रपट 'विराट पर्वम'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटातील काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रसंगांची तुलना मॉब लिंचिंगशी केली आहे. यानंतर तिच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर देखील वादविवाद सुरु झाला होता. अनेक लोक तिच्या वक्तव्याला पाठिंबा देत आहेत. तर, काही तिच्यावर टीका करत आहेत.
व्हिडिओत काय म्हणाली?
साई पल्लवीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मुलाखतीत दिलेल्या विधानावर स्पष्टीकरण देताना दिसत आहे. आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे साई पल्लवीने म्हटले आहे.
साई पल्लवी व्हिडिओमध्ये म्हणते की, मी पहिल्यांदाच तुमच्या सर्वांशी संवाद साधत आहे. मोकळेपणाने बोलणाऱ्यांपैकी मी नेहमीच एक आहे. मला माहीत आहे की मला बोलायला उशीर झाला आहे, पण मला माफ करा. माझे शब्द चुकीचे मांडले गेले आहेत.मला एवढेच सांगायचे होते की धर्माच्या नावावर कोणताही वाद होणे ही चुकीची गोष्ट आहे. मी एक तटस्थ व्यक्ती आहे. मी जे काही बोलले ते चुकीच्या पद्धतीने घेतले गेले आणि मांडले गेले, याचा मला धक्का बसला आहे. मुलाखतीत सांगितलेल्या गोष्टी वाईट पद्धतीने घेतल्या आहेत,असे स्पष्टीकरण तिने दिले आहे.