close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'लक्ष्या'च्या आठवणीने सलमान भावूक

लक्ष्या आणि सलमान यांनी एकत्र अनेक चित्रपट केले आहेत.

Updated: May 25, 2019, 11:20 AM IST
'लक्ष्या'च्या आठवणीने सलमान भावूक

मुंबई : बॉलिवूड दबंग सलमान खान सध्या 'भारत' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सलमानच्या अभिनयासोबत त्याची डान्सिंग स्टाईलही चाहत्यांमध्ये तितकीच प्रसिद्ध आहे. १९८८ मध्ये सलमानने 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात केली होती. या चित्रपटात सलमानचा रोल अगदी कमी होता. त्यानंतर आलेल्या 'मैने प्यार किया' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुप्रसिद्ध ठरला आणि या चित्रपटाने सलमानला एका वेगळ्याच उंचीवर नेलं. सलमानने सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अनेक चित्रपट केले आहेत. १९८९ मध्ये आलेल्या 'मैने प्यार किया' या चित्रपटाच्या सुपटहिट होण्याचे श्रेय सलमानने आपल्या 'लाडक्या लक्ष्या'ला दिलं आहे.

सलमानने नुकतंच टेलिव्हिजनवरील एका लहान मुलांच्या रिअॅलिटी शोसाठी शूट केलं. यावेळी सलमानने 'लक्ष्या'च्या आठवणींना उजाळा दिला. शोदरम्यान एका स्पर्धकाने सलमानच्या 'साजन' चित्रपटातील 'तुमसे मिलने की तमन्ना है' या गाण्यावर डान्स केला. हा डान्स परफॉर्मेंस पाहून सलमान अतिशय भावूक झाला. 

'या गाण्यासोबत माझ्या अनेक आठवणी जोडल्या आहेत. हे गाणं माझ्या सुपरहीट ठरलेल्या साजन चित्रपटातलं आहे. चित्रपटात हे माझं इंट्रोडक्शन सॉन्ग होतं. यात माझे जवळचे मित्र लक्ष्मीकांतही होते. मी त्यांच्यासोबत अनेक चित्रपट केले आहेत. मला वाटतं की, मैने प्यार किया या चित्रपटाच्या यशामागे लक्ष्मीकांत हे सर्वात मोठं कारण आहे. हे गाणं नेहमी मला त्यांची आठवण करुन देतं. परंतु दुर्दैवाने आज ते आपल्यात नाही' असं म्हणत सलमानने त्यांच्या जाण्याची खंत व्यक्त केली. 

सलमानचा 'भारत' येत्या ५ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ स्क्रिन शेअर करणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं आहे.