मुंबई : बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि कृती खारबंदा यांचा शादी मे जरुर आना हा सिनेमा आज रिलीज झाला. दोघांचा एकत्रित हा पहिलाच सिनेमा आहे. यावर्षात राजकुमार रावचे ट्रॅप, बरेली की बर्फी आणि न्यूटन हे तीन सिनेमे रिलीज झाले. तर कृतीचा हा तिसरा सामना आहेय
दिग्दर्शक - रत्ना सिन्हा
संगीत - आनंद राज आनंद
कलाकार - राजकुमार राव, कृती खरबंदा, गोविंद नामदेव
कानपूरमध्ये राहणार मिश्रा कुटुंब आपला मुलगा सतेंद्र(राजकुमार राव) च्या लग्नासाठी मुलगी शोधत असतात. यादरम्यान त्यांची ओळख शुक्ला कुटुंबाशी होते. शुक्ला यांची मुलगी आरती(कृती खरबंदा) मिश्रा कुटुंबांना पसंत येते. आरतीला भेटण्यासाठी सतेंद्रला तिच्या कॉलेजमध्ये पाठवले जाते.
पहिल्या भेटीत दोघांमध्ये खूप गप्पा रंगतात. आपण दोघे एकमेकांसाठीच बनलो आहेत असे दोघांनाही वाटू लागते. सगळ्यांच्या मर्जीने अखेर लग्न ठरते. आरतीच्या कुटुंबाकडे हुंडा देण्याइतका पैसा नसतानाही तिच्या आनंदासाठी घरातले खर्च करण्यास तयार होतात. आरती अभ्यासात हुशार असते. मोठ्या पदावर ऑफिसर होण्याचे तिचे स्वप्न असते. तसेच लग्नानंतरही नोकरी करायची अशी तिची इच्छा असते. सतेंद्र यासाठी तयार असतो. मात्र त्याची आई या गोष्टीला विरोध करते. अखेर लग्नाची रात्र उजाडते. सतेंद्र आणि कुटुंबिय लग्नासाठी आरतीच्या गावाला येतात. मात्र त्याचदिवशी आरतीच्या सिव्हिल सर्व्हिसचा रिझल्ट येतो. आरती मेन एक्झाम क्लिअर करते. यावेळी मात्र ती द्वंदात अडकते. त्यामुळे लग्न सोडून पळून जाते. त्यानंतर आय़एएस अधिकारी होते. मात्र आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता हे जाणण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावाच लागेल.
या सिनेमातील राजकुमार रावचा अभिनय लाजवाब आहे. दिवसेंदिवस त्याच्या अभिनयात चांगला बदल घडतोय. सिनेमातही त्याची भूमिक नैसर्गिक वाटते. सिनेमात राजकुमार रावने छोट्या शहरातील टिपिकल साधारण मुलाची भूमिका साकारलीये. कृतीचाही अभिनय चांगला झालाय.
सिनेमातील संगीत साधारण आहे. सिनेमातील गाणी आठवणीत राहतील अशी नाही. मात्र तितकी वाईटही नाहीत.
या सिनेमाचा ट्रेलर आणि नाव पाहून एखाद्या मुद्द्यावर आधारित असेल असे वाटले होते. मात्र यात केवळ प्रेम आणि धोका याशिवाय सिनेमात विशेष असे काही. दरम्यान, मुलींनी शिक्षण घेतले तर त्याचा फायदा व्हायलाच हावा असा संदेश देण्याचा प्रयत्न जरुर झालाय.
स्टार्स - अडीच स्टार्स