Shahrukh Khan Jawan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानंतर शाहरुख आता त्याचा 'जवान' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाची एक नवीन अपडेट त्यानं चाहत्यांना दिली आहे. याआधी 'जवान' हा चित्रपट 2 जून ही प्रदर्शनाची तारिख होती. आता ती पुढे ढकलण्यात आली असून 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. दरम्यान, आता अखेर त्याची फायनल रिलीज डेट समोर आली आहे. नुकतच शाहरुख खान आणि निर्माती गौरी खान यांनी 'जवान' या त्यांच्या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. त्यासोबत त्यांनी चित्रपटाची रिलीज डेटही सांगितली आहे.
शाहरुख खानने त्याचा इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा आगामी 'जवान' चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. मोशन पोस्टरमध्ये शाहरुख जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. हे पाहून पुन्हा एकदा किंग खान त्याचा पठाणमध्ये पाहायला मिळालेला अवतार दाखवणार असल्यानं त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. चित्रपटाची निर्माती आणि शाहरुखची पत्नी गौरी खाननं देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केले आहे आणि कॅप्शनमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख 7 सप्टेंबर 2023 असल्याचे सांगितले आहे.
'जवान' या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणेतील लोकप्रिय दिग्दर्शक अॅटलीनं केलं आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दाक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नयनतारा आणि शाहरुख हे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.यासोबतच या चित्रपटात साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती आणि सान्या मल्होत्रा देखील या चित्रपटाचा भाग असणार आहेत. तर पुष्पा स्टार अल्लू अर्जुन या चित्रपटात एक मोठं सरप्राईज घेऊय येणार आहे, खरं सांगायचं झालं तर या चित्रपटात अल्लू अर्जुनची पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे.
हेही वाचा : -15 डिग्री सेल्सियस तापमानात Rakul Preet Singh नं मारली थंड पाण्यात डुबकी, VIDEO व्हायरल
शाहरुख खानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सगळ्यात शेवटी 'पठाण' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटानं जगभरात बॉक्स ऑफिसवर 1 हजार कोटींची कमाई केली. यशराज फिल्म्सच्या या ब्लॉकबस्टर पठाणमध्ये शाहरुख खान सोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. तर या चित्रपटात जॉन अब्राहमनं देखील शाहरुखला चांगलीच टक्कर दिली आहे. तर सलमानची या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका होती. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदनं केले होते