सैफ आणि अमृता सिंग यांच्या घटस्फोटावर शर्मिला टागोर पहिल्यांदाच झाल्या व्यक्त; म्हणाल्या 'आम्ही फार...'

सैफ अली खान आणि अमृता सिंग 13 वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले होते. दरम्यान शर्मिला टागोर पहिल्यांदाच त्यांच्या घटस्फोटावर व्यक्त झाल्या आहेत.   

शिवराज यादव | Updated: Dec 28, 2023, 11:42 AM IST
सैफ आणि अमृता सिंग यांच्या घटस्फोटावर शर्मिला टागोर पहिल्यांदाच झाल्या व्यक्त; म्हणाल्या 'आम्ही फार...' title=

बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या आगामी 'कॉफी विथ करण 8' मध्ये मुलगा आणि आईची जोडी झळकणार आहे. शर्मिला टागोर आणि सैफ अली खान यावेळी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत. करण जोहरने या एपिसोडचा प्रोमो शेअर केला असून, यात दोघेही मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसत आहेत. दरम्यान करण जोहरने यावेळी सैफ अली खानच्या पहिल्या लग्नाचाही मुद्दा उपस्थित केला होता. सैफ अली खान आणि अमृता सिंग 13 वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले होते. यावेळी शर्मिला टागोर पहिल्यांदाच त्यांच्या घटस्फोटावर व्यक्त झाल्या आहेत. 

सैफ अली खानने 1991 मध्ये अमृता सिंगसोबत गुप्तपणे लग्न केलं होतं. लग्न केल्यानंतर त्याने आई शर्मिला टागोर यांना सांगितलं होतं. यामुळे शर्मिला टागोर दुखावल्या होत्या. सैफने यावेळी आपल्या पहिल्या लग्नाबाबत बोलताना सांगितलं की, "मी घरापासून दूर पळत होतो. इतक्या गोष्टी सुरु होत्या की मला फार गोष्टी आठवत नाही. सुरक्षेखातर मी हा निर्णय घेतला होता. मला वाटलं गुप्तपणे लग्न करणं जास्त सुरक्षित आणि चांगली गोष्ट आहे".

शर्मिला टागोर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, "ते दोघंही फार सारखे होते. ते दोघंही मजेशीर स्वभावाचे होते. ते दोघं जेव्हा कधी बोलायचे तेव्हा नुसतं हास्यकल्लोळ असायचा. ते इतरांची मिमिक्री करायचे, मस्करी करत ते डोळ्यातून पाणी आणायचे. सैफ मिमिक्री करण्यात आणि अमृता गोष्ट सांगण्यात किती चांगले आहेत हे तर तुला माहितीच आहे. ते दोघंही एकत्र आनंदात होते".

दरम्यान आपण आधीच विवाहित असल्याचं सांगितल्यानंतर शर्मिला टागोर यांना किती वाईट वाटलं होतं हे सैफने सांगितलं. तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ती रडू लागली. तू मला दुखावलं आहेस असं ती म्हणाली अशी आठवण सैफने सांगितली. शर्मिला टागोर यांनी सांगितलं की, "पालकांनी तुला मोठं केलं असून, ते नेहमी सोबत असतात. तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक छोटी मोठी गोष्ट त्यांच्यासोबत शेअर करायला हवी".

सैफ अली खानने यावेळी अमृतासोबच्या घटस्फोटावर बोलताना सांगितलं की, "गोष्टी फार बदलल्या, पण तिने मला चांगला पाठिंबा दिला होता. ती माझ्या दोन मुलांची आई असून, माझं तिच्यासोबतचं नातं चांगलं आहे. मी नेहमी तिचा आदर करतो. जेव्हा गोष्टी सुरळीत जात नाहीत तेव्हा खासकरुन मुलांसाठी फार वाईट वाटतं. त्यांच्यासोबत असं होऊ नये असं वाटतं. पण दुर्दैवाने ते होतं".

आपण सर्वात आधी आईसोबत घटस्फोटाबद्दल बोललो असं सैफने सांगितलं. "घटस्फोटाबद्दल सर्वात प्रथम मी आईला सांगितलं. तिने मला जर हा तुझा निर्णय असेल तर मी पाठीशी आहे असं सांगितलं. मला याचा फार फायदा झाला," असं सैफ म्हणाला.

शर्मिला टागोर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, “जेव्हा तुम्ही इतका काळ सोबत असता आणि इतकी सुंदर मुलं असतील, तेव्हा विभक्त होणं फार सोपं नसतं. मला माहिती आहे की त्या टप्प्यावर सामंजस्य दाखवणं कठीण असतं. कारण प्रत्येकजण दुखावलेला असतो. परंतु मी प्रयत्न केला. अमृताला शांत होण्यासाठी वेळ हवा होता. यामध्ये फक्त दूर राहायचं नसतं, तर इतरही अनेक गोष्टींचा समावेश होता. आमच्यासाठी तो आनंदाचा काळ नव्हता. कारण इब्राहिम अवघ्या 3 वर्षांचा होता. त्यात आमचा मुलांवर फार जीव जडला होता. खासकरुन टायगर [मंसूर अली खान पतौडी] यांचं इब्राहिमवर फार प्रेम होतं. तो चांगला मुलगा आहे असं ते म्हणायचे". 

पुढे त्या म्हणाल्या की, "अमृता आणि दोन्ही मुलांना गमावणं आम्हाला फार कठीण होतं. त्यामुळे फक्त सैफ नाही तर आम्हालाही तडजोड करावी लागली". सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचं 2004 मध्ये लग्न झालं होतं. त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुलं आहेत.