मुंबई : मनोरंजन विश्वाला हादरा देणाऱ्या एका बातमीनं सध्या अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जिथं कोरोनाच्या विळख्यात अनेक सेलिब्रिटी येऊ लागले आहेत तिथेच एका सेलिब्रिटीनं स्वत:चच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार अमेरिकन रॅपर जे स्टॅश यानं 27 वर्षांच्या आपल्या प्रेयसीचीही गोळी झाडून हत्या केली आहे.
सदर घटनेवेळी त्याची तीन मुलंही तिथे असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर या रॅपरनं गोळी झाडत स्वत:चं आयुष्यही संपवलं.
लॉस एंजेलिस पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसाची असल्याचं सांगण्यात येत आहे. टेंपल सिटी येथील पेंटलँड स्ट्रीटवरील एका घरात ही घटना घडली.
मुलांकडून पोलिसांना माहिती...
तीन मुलांपैकी एकानं पोलिसांना याबाबतची माहिती फोन करत दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले तेव्हा हे तिघंही प्रचंड घाबरले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार घटनास्थळी पोहोचलात मुलांनी त्यांच्या सुरक्षिततेची मागणी त्यांच्याकडे केली.
सूत्रांच्या माहितीनुसार स्टॅशच्या प्रेयसीनंही पोलिसांत घरगुती हिंसाराची तक्रार केली होती.
दरम्यान, घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तिथे एक महिला आणि एक पुरुष असे दोन मृतदेह आढळले. महिलेच्या शरीरावर अनेक गोळ्या झाडल्याची बाब पोलिसांनी समोर आणली.