देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी अयोध्येत बुद्धविहार उभारण्याची मागणी केली आहे. अयोध्येत सापडलेल्या प्राचीन अवशेषांवरून लक्षात येते की, बाबरी मशिदीच्या ठिकाणी बुद्धाची साकेत नगरी होती. अयोध्येत राम मंदिर, बाबरी मशीद होतेय यांचा आनंद आहे. पण अयोध्येत बुद्धविहार देखील उभे राहिले पाहिजे, अशी भूमिका आनंद शिंदे यांनी घेतली आहे.
अयोध्येतील बुद्धविहार हा बौद्ध बांधवांचा हक्क आहे. यासाठी प्राणाची आहुती देण्यास ही बौद्ध बांधवांनी मागे पुढे पाहू नये. तसेच बुद्धविहार गट तट विसरून सर्व बौद्ध-आंबेडकरी नेत्यांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन आनंद शिंदे यांनी केले.
केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे नेते रामदास आठवले यांनीही अयोध्येत महाबुद्धविहार बांधण्याची मागणी उचलून धरली आहे. भारत बौद्धमय असताना अयोध्येचे नाव साकेत नगरी होते. अयोध्येत बाबरी मशीद उभारण्या आधी राम मंदिर होते आणि त्यापूर्वी बुद्ध विहार होते. मात्र अयोध्येतील मंदिर-मशिदीचा वाद कायमचा मिटला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानानुसार न्यायालयाने निकाल दिला असून त्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिर होणार आहे तसेच मशिदीला ही जागा देण्यात आली असून वादग्रस्त जागा सोडून अयोध्येत अन्यत्र जमीन घेऊन तेथे भव्य बुद्ध विहार उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन सरकारकडून बुद्ध विहारासाठी जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.