मुंबई : 'सप्तपदी ही रोज चालते....' असं म्हटलं असता आपल्या जोडीदाराला देवाब्राह्मणांच्या साक्षीने आयुष्यभराची साथ देणारी नववधू अनेकांच्या डोळ्यांसमोर उभी राहते. विवाहबंधनात आल्यानंतर फक्त दोन व्यक्तीच एकत्र येतात असं नाही, तर त्या व्यक्ती संपूर्ण मनाने दुसऱ्या एका व्यक्तीचा, त्याच्या किंवा तिच्या स्वभावाचा आणि अर्थातच चांगल्यावाईट गुणांचाही स्वीकार करतात. या अनोख्या आणि तितक्याच पवित्र अशा नात्याची सुरुवात एका सेलिब्रिटी जोडीने अनोख्या आणि तितक्या स्तुत्य निर्णयाने केली.
कन्नड कलाविश्वात लोकप्रिय असणाऱ्या अभिनेता चेतन कुमार याने सामाजिक कार्यकर्ती आणि वकील असणाऱ्या मेघा या त्याच्या प्रेयसीशी लग्नगाठ बांधली. चेतन आणि मेघाचा हा विवाहसोहळा 'बिग फॅट इंडियन वेडिंग' या पठडीतून बाहेर पडत सामाजिक भान जपण्याला प्राधान्य देत या दोघांनी भारतीय संविधानाला साक्ष ठेवत लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
विशेष विवाह कायद्याअंतर्गत लग्नबंधानात अडकल्यानंतर त्यांनी स्वागतसोहळ्यासाठी थेट एका आश्रमाची वाट धरली. ज्या आश्रमाशी हे दोघंही गेल्या बऱ्याच काळापासून जोडले गेले आहेत, अशा बंगळुरू येथील विनोबा भावे आश्रमात जात चेतन कुमार आणि त्याची पत्नी मेघा यांनी हा नवा प्रवास सुरु केला. हजारोंच्या संख्येने चाहते, मित्रपरिवार अशा मंडळींच्या उपस्थितीत त्यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला. मुळात राजकीय नेते, कलाविश्वातील मंडळी अशा व्यक्तींसोबतच समाजातील इतरही प्रत्येक घटक आपल्यासाठी महत्त्वाचा असण्याची भावना चेतनने व्यक्त केली. सोबतच आपल्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या याच मंडळींचे त्याने आभारही मानले.
मेघाने या नव्या प्रवासाची सुरुवात होताच, चेतनसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ज्यामध्ये हे नवविवाहित दाम्पत्य त्यांचं सामाजिक भान जपण्यात कुठेच कमी पडत नसल्याचं स्पष्ट झालं.
चेतन आणि मेघाच्या या विवाहसोहळ्याचा कोणाच ब्राह्मणाची उपस्थिती नव्हती. तर, त्यांनी सामाजिक मूल्य आणि निसर्गाची शपथ घेत सहजीवनाचं पाऊल उचललं. ही शपथ देण्यासाठी तृतीयपंथी समुदायातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. लग्नसोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येक पाहुण्यानेही समाजाप्रती असणारी आपली जबाबदारी ओळखावी या अनुषंगाने चेतन आणि मेघाकडून एक आठवण भेट देण्यात आली.
'रिटर्न गिफ्ट' म्हणून देण्यात आलेल्या या भेटीमध्ये भारतीय संविधानाची प्रत होती. प्रत्येकाने संवैधानिक मूल्यांचं आचरण करत एक चांगली व्यक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करावी आणि चांगल्या समाजाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी हा त्यामागचा मुख्य हेतू. अनाथ आश्रमातील मुलांना मदत करणं असो किंवा मग, त्यांच्यासाठी सातत्याने मदतीचा हात पुढे करणं असो. समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत भविष्यातही काही नवे आदर्श प्रस्थापित करणारी ही जोडी खऱ्या अर्थाने सुपरहिट आहे असंच म्हणावं लागेल.