कलाक्षेत्राकडून राजकारणाकडे वळणाऱ्या अभिनेत्रीचं गोव्यात निधन

भाजपमधील प्रसिद्ध आणि बहुचर्तित चेहरा हरपला

Updated: Aug 23, 2022, 11:55 AM IST
कलाक्षेत्राकडून राजकारणाकडे वळणाऱ्या अभिनेत्रीचं गोव्यात निधन  title=

मुंबई : भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. निधन झालं तेव्हा त्या गोव्यात होत्या. सोनाली फोगट त्यांच्या काही कर्मचाऱ्यांसोबत गोव्यात गेल्या होत्या. सोनाली फोगट यांच्या निधनामुळे राजकीय आणि बॉलिवूड विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आणि कलाकारांनी फोगट यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.  आदमपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार म्हणून मागील विधानसभा निवडणूक लढवली होती. 

 

कलाक्षेत्राकडून राजकारणाकडे वळणाऱ्या अभिनेत्री सोनाली अचानक पडद्याआड गेल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. बिग बॉस 14 मध्ये वाइल्ड कार्ड म्हणून एंट्री घेतलेल्या सोनाली फोगट अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिल्या.

अँकरिंग, मॉडेलिंग आणि राजकारणाव्यतिरिक्त सोनाली फोगट यांनी पंजाबी आणि हरियाणवी सिनेमा, म्युझिक व्हिडीओमध्ये देखील कौशल्याची छाप सोडली आहे. 

'छोरियां छोरों से कम नहीं होती' हा सोनाली फोगट यांचा 2019 साली प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा होता. 2016 मध्ये, सोनाली फोगट प्रसिद्धीच्या झोतात आल्या जेव्हा पती संजय यांचा फार्म हाऊसमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. सोनाली त्यावेळी मुंबईत होत्या. सोनालीचे पती राजकारणात सक्रिय होते.