चक्क अभिनेत्यासाठी त्याने बदलली लग्नाची तारीख

हा तर खरा 'जबरा फॅन'

Updated: Nov 12, 2019, 03:07 PM IST
चक्क अभिनेत्यासाठी त्याने बदलली लग्नाची तारीख
ममूथी

मुंबई : कलाकार आणि चाहत्यांमध्ये असणारं नातं एक अनेकदा शब्दांत व्यक्त करता येत नाही. कोणतंही रक्ताचं नातं नाही, कोणतीही अपेक्षा नाही, कोणतीही दैवाणघेवाणही नाही, पण तरीही सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये असणारं नातं मात्र आकारास यायचं ते येतंच. बरं य़ा नात्याला अमुक असं नाव किंवा रुपही नाही. अशा या खऱ्या अर्थाने नि:स्वार्थ नात्याची झलक काही दिवसांपूर्वीच पाहायला मिळाली. ज्याविषयीची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. 

चर्चा होण्यामागचं निमित्तंही तसंच आहे. कारण 'जबरा फॅन' हे विशेषण खऱ्या अर्थाने कोणासाठी वापरावं, हेसुद्धा स्पष्ट झालं आहे. मेमन सुरेश हे त्या 'जबरा फॅन'चं खरं नाव. दाक्षिणात्य आणि विशेषत: मल्याळम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने आणि प्रभावी अंदाजाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ममूथी यांचा हा चाहता. बरं हा काही साधासुधा चाहता नाही. तर, हा एक 'जबरा फॅन'च म्हणावा लागेल, कारण त्याने ममूथी यांच्या 'ममंगम' या चित्रपटासाठी थेट त्याच्या लग्नाची तारीखच बदलली होती. 

२१ नोव्हेंबरला केरळमधील उत्तर परवूर येथे त्याच्या विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, जेव्हा आपल्या आवडीच्या अभिनेत्याचा चित्रपट त्याच दिवशी प्रदर्शित होणार आहे हे त्याला कळलं तेव्हा त्याने लग्नाची तारीख बदलत काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. 

ममूथी यांच्या चित्रपटाचा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहता यावा यासाठीच त्याने या तारखा बदलल्या. परिणामी, ३० ऑक्टोबरला त्याने लग्न करण्याचा निर्णय़ घेत पुढे पत्नीलाही 'फर्स्ट डे फर्स्ट शो'साठी नेण्य़ाचा मानस व्यक्त केला. 
ममूथी यांची मुख्य भूमिका असणारा 'ममंगम' "Mamangam" हा चित्रपट मल्याळम, तामिळ, तेलुगू आणि हिंदी या चित्रपटांमध्ये प्रदर्शित होणार आहे. एम. पद्मकुमार यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती वेणू कुण्णाप्पिल्ली यांनी केली आहे.