'बस बाई बस'मध्ये सुप्रिया सुळे यांची हजेरी, पीएम मोदींच्या फोटोसोबत चक्क गुजरातीत संवाद

सुप्रिया यांनी 'बस बाई बस' या शोमध्ये हजेरी लावली होती. 

Updated: Aug 3, 2022, 05:35 PM IST
'बस बाई बस'मध्ये सुप्रिया सुळे यांची हजेरी, पीएम मोदींच्या फोटोसोबत चक्क गुजरातीत संवाद

‘झी मराठी’वर नुकताच ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. या कार्यक्रमाची थीम महिलांवर आधारित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड प्रसारित झाला असून या एपिसोडमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. त्यांनी सुबोध भावेसोबत, राजकारणासह इतर वेगवेगळ्या विषयांवर खूप गप्पा मारल्या. याच एपिसोडमध्ये त्यांनी चंद्रकांत पाटील, नरेंद्र मोदी आणि एकनाथ यांच्याविषयी काही गोष्टी सांगितल्या. 

सुबोध भावेनं या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांच्या व्हायरल झालेल्या भाकरी भाजतानाच्या व्हिडीओची आणि यासोबत त्या व्हिडीओनंतर चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांनी ‘घरी काम करा’ असा सल्ला दिला होता अशी आठवण करून देत, याबद्दल काय वाटतं? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी मजेदार प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'मला खरं तर त्यांच्या या सल्ल्याचं फार काही वाईट वाटलं नाही कारण मी एक महिला आहे आणि एक गृहिणी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. घरात स्वयंपाक करण्याला मी कमीपणा समजतच नाही. कारण दिवसभर तुम्ही कितीही काम केलं तरीही जेव्हा घरी जाता तेव्हा तुम्हाला घरचंच जेवण लागतं. इथे सेटवर जेव्हा तुम्ही जेवता तेव्हाही पहिला घास घेतल्यानंतर तुम्हाला घरच्या जेवणाची आठवण येते. त्यामुळे घरच्या जेवणाला पर्याय नाही.'

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, 'विरोधक जे बोलतात ते मी फार काही मनाला लावून घेत नाही. एवढं तर चालतं. त्यांनी थोडी आमच्यावर टीका करायची आम्ही थोडी त्यांच्यावर टीका करतो.' याशिवाय जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की चंद्रकांत पाटील यांना या कार्यक्रातून काय सांगाल तेव्हा त्या म्हणाल्या, 'केंद्राचा निधी आजकाल मिळत नाही. मोदी साहेबांनी कट लावलाय. जरा तुम्ही सांगा त्यांना आमचा निधी लवकर द्यायला. लोक म्हणतात तुमचे आणि अमित शाहा यांचे चांगले संबंध आहेत. माझेही चांगले संबंध आहेत. बाकी वहिनींना सांगा मी विचारलं म्हणून आणि लवकरच घरी जेवायला या तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल डीश बनवते.'

पुढे सुप्रिया सुळे यांना मोदींचा फोटो दाखवण्यात आला. त्यावेळी त्या नरेंद्र मोदी यांच्याशी गुजरातीत संवाद साधू लागल्या, 'नमस्कार मोदीजी कसे आहात तुम्ही…..मी गुजरातला जाऊन आले. तिथे सगळं ठिक आहे. गुजरात खूप सुंदर आहे. तिथे मला दर्शनाबेन भेटल्या. त्यांनी मला सुरतला गेल्यावर फाफडाही खायला दिला. मी सुरतलाही गेले होते. तिकडे काही आमदारही होते. ते रेडिसन्स हॉटेलमध्ये थांबलेत याची मला काही माहितीच नव्हती. अमित शाह पण तिथे होते. ते रोज संसदेत येतात. ते मस्त भाषण करतात. पण तुम्ही संसदेत येत नाहीत, अशी खंत देखील सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.  

पुढे सुप्रिया म्हणाल्या, 'मी गुजराती भाषा बोलायला थोडं थोडं शिकत आहे. मी थोडं गुजराती, थोडं मराठीत बोलते. गुजरातचे आणि महाराष्ट्राचे संबंध मोरारजी भाईंच्या काळापासून चांगले आहेत. आपली पहिली भेट झाली तेव्हा तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री होता. तेव्हा मी, तुम्ही आणि अनुराग ठाकूर आपण मॅच पाहायला गेलो होतो. तुम्ही या पुन्हा आपण मॅच पाहायला जाऊ, फार मजा येईल. तुम्ही पंतप्रधान आहात, तुमचा वेळ महत्त्वाचा आहे मला कल्पना आहे. चला मी निघते'

पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो दाखवताच क्षणी सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'नमस्कार कसे आहात. तुम्ही कमी बोलता आणि मी फक्त बोलतच राहते. त्यादिवशी आपली उद्धवजींच्या केबिनमध्ये भेट झाली होती, तेव्हा तुम्ही मला बोलला नाहीत की आपण सुरतला निघणार. आपण किमान तिथे विधानभवनात भेटलो असतो. आता मी घरी खूप चिडवते कारण आता पवार विरुद्ध शिंदे होणार. कारण पवार माझे वडील आणि माझ्या आईचं आडनाव शिंदे. मी परवा दादालाही सांगितलं की, दादा आता किती मजा येणार ना, कारण पवार विरुद्ध शिंदे होणार. बाबा जिंकणार की आई हे काळचं ठरवेल. आपला श्रीकांत मला खूप प्रिय आहे. श्रीकांत खूप गोड मुलगा आहे. मला आनंद वाटतो. परवा भेटला होता दिल्लीत, तुम्ही दिल्लीत आला होता, पण आपली भेटच झाली नाही. श्रीकांतची होते. छान गोड मुलगा आहे. मला खूप प्रिय आहे.'

 

पुढे त्या म्हणाल्या, सगळीकडे आता पाऊस वैगरे पडतोय. बघा बाबा त्या चिन्हाचं वैगरे काय होतं ते उरकून टाकून जरा कामाला लागूया हो. सव्वा महिना झाला. माझ्या कामाचा इतका खोळंबा झाला आहे, एखाद्या कलेक्टरला किंवा अधिकाऱ्याला फोन केला की अधिकारी म्हणतात, अजून मंत्रीच जागेवर नाहीत. जरा तेवढं बघा. माझी मतदार संघातील फार काम अडकलीत, तेवढं फक्त लवकर करुन घ्या. खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इतकं कमी बोलता की मला दडपण येतं. मी बोलतंच राहते. आपलं नातं वन वे आहे असंच वाटतं. ओके भेटूया आपण. जय महाराष्ट्र.'