'दिल बेचारा'च्या ट्रेलरनं मोडले सर्व विक्रम; धोनीशी आहे असं कनेक्शन

ट्रेलरची उत्सुकता प्रदर्शित होण्याआधीपासूनच शिगेला पोहोचली होती

Updated: Jul 7, 2020, 02:47 PM IST
'दिल बेचारा'च्या ट्रेलरनं मोडले सर्व विक्रम; धोनीशी आहे असं कनेक्शन
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आगामी किंबहुना त्याच्या अखेरच्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. संजना सांघी आणि सुशांतच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता प्रदर्शित होण्याआधीपासूनच शिगेला पोहोचली होती. ज्याचा प्रत्यय आला ट्रेलरला मिळालेल्या प्रसिद्धीतून. 

अवघ्या चोवीस तासांमध्ये 'दिल बेचारा'च्या ट्रेलरला सर्वाधिक लाईक्स मिळाले आहेत. जागतिक स्तरावर या चित्रपटाच्या ट्रेलरनं सर्वाधिक लाइक्स मिळवले आहेत. ज्या धर्तीवर या ट्रेलरनं 'ऍव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर'लाही मागं टाकलं आहे. 

'द फॉल्ट इन अवर स्टार्स' या हॉलिवूड पटाच्या आणि याच नावाच्या जॉन ग्रीन यांच्या कादंबरीतील कथानकावरच 'दिल बेचारा'चं कथानक आधारलेलं आहे. मुकेश छाबरा दिग्दर्शित हा चित्रपट २४ जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सैफ अली खान आणि स्वस्तिका मुखर्जीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.  

धोनीशी आहे, असं कनेक्शन... 

महेंद्रसिंह धोनीच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच हा ट्रेलर प्रदर्शित झाला. मुख्य म्हणजे सुशांतनं त्याच्या कारकिर्दीत धोनीची व्यक्तिरेखा साकारत त्याच्या अभिनयाचा उत्तम नमुना सादर केला होता. अशा या धोनीच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सुशांत या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्यानं जणू माहिला वाढदिवसाची अनोखी भेटच दिली. बस्स, नेटकऱ्यांनी मग या गोष्टी एकमेकांशी जोडत पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणींत रमण्यास सुरुवात केली.