#DilBecharaTrailer : जगण्यासाठी त्यांच्या प्रेमाची धडपड; पाहा सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर

काही दिवसांपूर्वीच आत्महत्या करत सुशांतनं जगाचा निरोप घेतला आणि....

Updated: Jul 6, 2020, 05:22 PM IST
#DilBecharaTrailer : जगण्यासाठी त्यांच्या प्रेमाची धडपड; पाहा सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : एखाद्या चित्रपटाचा Trailer ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी कलाकारांच्या मनात उत्साह, भिती, दडपण अशा अनेक भावनांनी घर केलेलं असतं. या भावनांमध्ये अर्थातच आनंदही असतो. पण, 'दिल बेचारा' Dil Bechara या चित्रपटाच्या बाबतीत मात्र तसं काही घडताना दिसत नाही आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या मनात उत्साह आणि दडपण तर आहे, पण आनंद काहीसा कमीच आहे. यामागे कारण आहे ते म्हणजे चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेता Sushant singh rajput सुशांत सिंह राजपूतची अकाली एक्झिट. 

'इमॅन्युअल राजकुमार ज्युनिअर' (मॅनी) आणि 'किझी बासू' यांची कथा या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूत आणि संजना सांघी मुख्य भूमिकेत दिसत असून, खऱ्या अर्थानं जगण्यासाठी त्यांच्या प्रेमाची धडपड नेमकी कशी सुरु असते याचीच झलक या भावनिक ट्रेलरमधून पाहता येते. 

शिकवणीच्या पैशांतून सुशांतनं खरेदी केलेली पहिली बाईक  

विनोद, प्रेम, रागरुसवा, इच्छा अशा कैक गोष्टी एकवटलेल्या या ट्रेलरमध्ये भावनाच वरचढ ठरतात आणि काही मिनिटांचा ट्रेलर, त्यातील संवाद सुशांत आपल्यात नाही या आर्त भावनेनं अंगावर शहारा आणून जातात. त्याचा हा अखेरचा चित्रपट असला तरीही जितक्या धडाक्यात त्यांनं या कलाविश्वात पदार्पण केलं होतं अगदी त्याच अंदाजात खऱ्या अर्थानं हा कलाविश्वाला त्याचा अखेरचा अलविदा असेल असं म्हणायला हरकत नाही.

'द फॉल्ट इन अवर स्टार्स' या हॉलिवूड पटाच्या आणि याच नावाच्या जॉन ग्रीन यांच्या कादंबरीतील कथानकावरच 'दिल बेचारा'चं कथानक आधारलेलं आहे. मुकेश छाबरा दिग्दर्शित हा चित्रपट २४ जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रजर्शित होणार आहे. यामध्ये सैफ अली खान आणि स्वस्तिका मुखर्जीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.