मुंबई : कोरोना नियमांची पायमल्ली करून अंधेरीच्या ड्रॅगन फ्लाय क्लबमध्ये मध्यारात्री पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये गायक गुरु रंधावा (Guru Randhawa), सुझान खान (Sussanne Khan)आणि रॅपर बादशाह (Badshah ) यांच्यासोबतच पोलिसांनी ३४ जणांना ताब्यात घेतलं. यासंदर्भात आता अभिनेता हृतिक रोशनची एक्स-पत्नी सुझान खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. अटके संदर्भातील वृत्त खोटं असल्याचं तिने सांगितलं आहे.
सुझान म्हणाली, 'काल रात्री मी माझ्या जवळच्या मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त सहार येथील जेडब्ल्यू मेरिएटच्या ड्रॅगन फ्लाय क्लबमध्ये डिनरसाठी गेले होते. रात्री जवळपास अडीचच्या सुमारास पोलीस क्लबमध्ये आले. त्यावेळी पोलीस आणि क्लबच्या व्यवस्थापकांमध्ये चर्चा सुरू होती. त्यामुळे आम्हाला सकाळी सहा वाजता घरी परतण्याची परवानगी देण्यात आली.'
यादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त खोटं आणि बेजबाबदार असल्याचं वक्तव्य सुझानने दिलं. पोलीस आणि क्लबमध्ये वाद होता. परंतू पोलिसांनी आम्हाला क्लबमध्ये का थांबावलं हे मला अद्यापही कळालेलं नाही. असं देखील ती म्हणाली. त्याचबरोबर तिने पोलीसांबद्दल आदर असल्याचं देखील वक्तव्य केलं.
काय आहे प्रकरण
मंगळवारी पोलिसांनी क्लब ड्रॅगन फ्लाय क्लबवर मध्यरात्री तीन वाजता धाड घालून काही प्रतिष्ठित व्यक्तींसह ३४ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी गायक गुरु रंधावा (Guru Randhawa), सुजैन खान (Sussanne Khan)आणि रॅपर बादशाह (Badshah ) यावेळी उपस्थित होते.
या पार्टीत १९ जण दिल्ली आणि पंजाबमधून आले होते. या व्यतिरिक्त दक्षिण मुंबईतूनही काहीजण या पार्टीत सहभागी होते. पोलिसांनी एकूण २७ ग्राहक आणि ७ कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. ताब्यात घेतलेल्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलंय. तर दिल्लीहून आलेल्यांना सकाळी सहा वाजता पुन्हा पाठवण्यात आले.