‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील कलाकाराने व्यक्त केली 'बिग बॉस'मध्ये जाण्याची इच्छा, म्हणाला 'दोन वेळा...'

येत्या बिग बॉसच्या पर्वात तो झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप वाहिनीने याबद्दलची कोणतीही माहिती दिलेली नाही. 

नम्रता पाटील | Updated: Apr 21, 2024, 08:06 PM IST
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील कलाकाराने व्यक्त केली 'बिग बॉस'मध्ये जाण्याची इच्छा, म्हणाला 'दोन वेळा...' title=

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : भारतीय टेलिव्हिजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून 'बिग बॉस'कडे पाहिले जाते. छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणूनहा कार्यक्रम सर्वत्र चर्चेत असतो. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कलाकार मंडळी ठराविक दिवसांसाठी राहतात. त्यांना दर आठवड्यात काही ना काही टास्क दिले जातात आणि ते पूर्ण करण्यासाठी हे सर्व कलाकार हे प्रयत्न करताना दिसतात. 'बिग बॉस हिंदी' या कार्यक्रमाचा 17 पर्व आतापर्यंत झाले आहेत. आता लवकरच या कार्यक्रमाचे 18 वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या कार्यक्रमात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील एका कलाकाराने जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी घराघरात प्रसिद्ध आहे. या मालिकेत दया बेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीने 2017 मध्ये मालिकेला रामराम केला. त्यानंतर भव्य गांधी, राज अनाडकत, शैलेश लोढा, नेहा मेहता अशा अनेक कलाकारांनी मालिकेतून एक्झिट घेतली. 

आता यातीलच एका अभिनेत्याने बिग बॉसमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्याने दोन वेळा या कार्यक्रमाची ऑफर नाकारल्याचेही सांगितले. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून टप्पू फेम अभिनेता राज अनाडकट आहे. राजने नुकतंच त्याच्या व्लॉगद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने त्याला बिग बॉसची ऑफर मिळाल्याचे सांगितले. 

राज अनाडकट काय म्हणाला?

"मला दोन वेळा बिग बॉसची ऑफर मिळाली होती. ही ऑफर 2022 आणि 2023 या दोन पर्वांची होती. पण काही कारणांमुळे मला तेव्हा बिग बॉसचा कार्यक्रम करणं जमलं नाही. मी या कार्यक्रमाचा खूप मोठा चाहता आहे. मी बिग बॉसच्या प्रत्येक पर्वाचे भाग पाहिले आहेत. आता जर मला बिग बॉसमध्ये जाण्याची संधी मिळाली तर मला त्यात जायला नक्कीच आवडेल. मी नक्की तो कार्यक्रम करेन. मला या कार्यक्रमाची संकल्पना खूप आवडते", असे राज अनाडकट म्हणाला.  

दरम्यान राज अनाडकटच्या या वक्तव्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. यामुळे येत्या बिग बॉसच्या पर्वात तो झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप वाहिनीने याबद्दलची कोणतीही माहिती दिलेली नाही.