मुंबई : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटानं पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यास सुरुवात केली. 1990 दरम्यान, काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराला या चित्रपटातून वाचा फोडण्यात आली होती. चित्रपटाच्या पहिल्या दृश्यापासून ते अगदी शेवटच्या फ्रेमपर्यंत प्रत्येक दृश्यानं प्रेक्षकांना पडद्यासमोर खिळवून ठेवलं. (The Kashmir files)
हल्लीच अभिनेते अनुपम खेर यांची भाची वृंदा खेर हिनं चित्रपटाच्या क्लायमॅक्ससंदर्भात नुकतंच एक वक्तव्य केलं. ज्यामध्ये तिनं म्हटल्यानुसार काही दृश्यांच्या वेळी तर चित्रीकरणासाठी सेटवर उपस्थित राहणंही कठीण होत होतं. अनेकांनी तर तिथंच ढसाढसा रडण्यास सुरुवात केली होती.
हा एक असा चित्रपट आहे, जिथं दहशतवाद्यांच्या क्रूर मानसिकतेवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपटातील काही दृश्य पाहून रक्त सळसळतं, तळपायाची आग मस्तकात जाते आणि डोकं भणभणून जातं. हे सर्व चित्रीत करत असताना, तर सेटवर असणाऱ्या सर्वांचे डोळे पाणावले होते, असं वृंदा खेरनं सांगितलं.
चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये शारदा पंडित (भाषा सुंबली) हिला विवस्त्र करुन दहशतवादी अक्षरश: तिच्या शरीराचे तुकडे करताना दाखवण्यात आलं आहे. याचबाबत सांगताना चित्रीकरणादरम्यान भाषा भावनिक आणि मानसिकरित्या पूर्णपणे तुटली होती, असं सांगितलं.
वृंदानं सांगितल्यानुसार या चित्रपटात जितक्या भावना दाखवण्यात आल्या आहेत त्या सर्व खऱ्या आणि पूर्ण मनापासूनच आलेल्या आहेत. मुद्दा असा, की चित्रपटात दाखवण्यात आलेली ही दृश्य म्हणजे तेव्हा घडलेलं वास्तव मांडण्याचा एक प्रयत्न.
हे सर्व वास्तवात घडलं आहे, याच विचारानं तुमचंआमचं मन विषण्ण होतं, तर प्रत्यक्षदर्शींच्या मनातील घालमेल मांडणं निव्वळ अशक्यच.
वृंदा खेर ही अभिनेते अनुपम खेर यांच्या भावाची मुलगी आहे. तिनं चित्रपटात कश्मिरी पंडित भावना कौलची भूमिका निभावली आहे. खोऱ्यातून पळ काढत निर्वासितांच्या कॅम्पमध्ये तिनं आधार घेतला होता.
माध्यमांशी संवाद साधताना वृंदानं चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी घडलेल्या अनेक प्रसंगांना उजाळा दिला. दरम्यान, वास्तवाला अतिशय प्रभावीपणे मांडत या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
200 कोटी रुपयांच्या कमाईच्या दिशेनम चित्रपटाची होणारी वाटचाल त्याच्या वाट्याला आलेल्या यशाचं गणित अधिक स्पष्ट करत आहे.