मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा पदार्पणातील चित्रपट 'स्टुडेंट ऑफ द ईयर २' बॉक्स ऑफिसवर खास कमाल करु शकला नाही. मात्र अनन्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते. अनन्याच्या भूमिकेचं चित्रपट समिक्षकांनी कौतुकही केलं. मात्र अनन्या आलिया भट्टला आपला आदर्श मानत असल्याचा, खुलासा तिने केला आहे.
'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अनन्याने आलियाबाबत सांगितलं. 'बॉलिवूडमधील आलियाचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. आलियाने सुरुवातीच्या करियरपासून ते आता यशाच्या शिखरावर असतानाही, तिने कधीही स्वत:ला परफेक्ट असल्याचा दिखावा केला नाही आणि तिच्याबाबातची हीच गोष्ट आवडल्याचं' अनन्याने म्हटलंय.
'आलिया तिच्या पहिल्या चित्रपटातही अतिशय सामान्य होती. त्यानंतर एक कलाकार म्हणून ती अधिक उत्तमरित्या घडू लागली आणि आज तिचं काम सर्वांसमोर आहे, आलियाकडून मला नेहमीच प्रेरणा मिळत असल्याचं' अनन्याने सांगितलं.
बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार चंकी पांडे यांची मुलगी असल्याच्या नाते तिला प्रेशर असल्याचंही तिनं म्हटलंय. 'माझ्यावर प्रेशर असतं, पण मी नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देऊ इच्छित नसल्याचंही' तिनं सांगितलं.
अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी 'पति, पत्नी और वो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. अनन्यासह या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरही प्रमुख भूमिका साकारणार आहे. येत्या ६ डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.