मुंबई : मातृत्त्वं हे कोणत्याही महिलेला पूर्णपणे बदलतं. मानसिक आणि शारीरिकरित्या येणाऱ्या बदलांसोबतच काही बदल असेही असतात जे शब्दांत मांडता येत नाहीत. मुळात गरोदरपणापासून ते बाळाला जन्म देण्यापर्यंतच्या काळात एका स्त्रीला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. या काळात होणारा एखादा लहानसा आघातही गरोदर महिलेची मानसिकता बदलतो.
एका चित्रपट अभिनेत्रीला तर, अतिशय मोठ्या आघाताला सामोरं जावं लागलं होतं. बाळाचं स्वप्न पाहून हे स्वप्न अपूर्ण राहणारी ही अभिनेत्री आहे बिंदू.
60 आणि 70 च्या दशकांमध्ये बिंदू यांनी चित्रपटसृष्टी खऱ्या अर्थानं गाजवली होती. शेजारीच राहणाऱ्या चंपकलाल झवेरी यांच्यावर त्या प्रेम करत होत्या.
वयाच्या 15 व्याच वर्षी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. बिंदू यांच्याकडे सर्वकाही होतं. पण, त्यांना कधीही बाळाचं सुख मिळालं नाही. आजही त्यांना या गोष्टीची खंत वाटते.
तुम्हाला कोणत्या गोष्टीची खंत आहे का, असं विचारलं असता मला केव्हाही मातृत्त्वाचं सुख मिळालं नाही असं बिंदू म्हणाल्या होत्या.
'मातृत्त्वाचं सुख माझ्या नशीबी नव्हतं. मी आई नाहीच होऊ शकले. 1977 मध्ये मी गरोदर होते. चित्रीकरणही मी थांबवलं होतं. पण, काही अडचणी आल्या.
गरोदरपणातच सहाव्या महिन्यात मी बाळ गमावलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझं डोहाळेजेवण होतं. तो क्षण अत्यंत वेदनादायी होता. त्यावेळी सुनील दत्त आणि नर्गिस मला आधार देण्यासाठी आले होते.
शर्मिला टागोर यांनी त्या क्षणी माझ्यासाठी एक पत्र लिहिलं होतं, ते क्षण मी विसरु शकत नाही.'
बाळाच्या जन्मासाठी बिंदू यांनी टेस्ट ट्युब बेबी आणि इतरही काही पर्याय अवलंबले. परदेशात उपचारही घेतले. पण, याचा काही फायदा झाला नाही.
काही महिने परदेशात राहिल्यानंतर पुढे वर्षभराचा काळ तिथे राहण्याची माहिती त्यांना डॉक्टरांकडून देण्यात आली जे बिंदू यांना अशक्य वाटत होतं.
प्रत्येक महिलेला मातृत्त्वाचं सुख हवं असतं. पण, मुळात आपल्या पदरी जे पडेल त्यातच आनंदी असलं पाहिजे असं बिंदू सांगतात.