नवी दिल्ली : १९५० च्या दशकात हिंदी सिनेमातील सर्वात प्रसिद्ध बालकलाकार अभिनेत्री डेझी ईरानी यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केलाय.
वयाच्या सहाव्या वर्षी आपल्यावर बलात्कार झाला होता, असा खुलासा डेझी यांनी आत्ता केलाय. डेझी या फराह खान आणि फरहान अख्तर यांची ही मावशी आहेत.
'मुंबई मिरर'नं दिलेल्या माहितीनुसार, जगभरात सुरू असलेल्या #MeToo कॅम्पेनकडून प्रेरणा मिळाल्यानंतर डेझी यांनी आपलं मौन सोडण्याचा निर्णय घेतला... आत्ताच्या क्षणीही अनेक बालकलाकार सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करत आहेत, त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. बालकलाकारांच्या आई-वडिलांनी आणि मेंटर्स म्हणून काम पाहणाऱ्यांनी चिमुरड्यांच्या सुरक्षेकडे गांभीर्यानं पाहावं, असंही त्यांनी म्हटलंय.
माझा गार्डीयन म्हणून काम पाहणाऱ्या एका व्यक्तीनं 'हम पंछी एक डाल के' या सिनेमाच्या शुटींग दरम्यान मला मद्रासला नेलं होतं. इथं एका रात्री हॉटेलच्या रुममध्ये त्यानं माझ्यासोबत जबरदस्ती केली... आणि मला बेल्टनंही मारलं... याबद्दल कुणाला काही सांगितलं तर ठार मारण्याचीही धमकी दिली, असा खुलासा डेझी यांनी केलाय.
डेझी यांच्या म्हणण्यानुसार, तो प्रसंग आजही माझ्या अंगावर काटे उभे करतो... ती व्यक्ती आता हयात नाही. त्याचं नाव नजर होतं आणि ते प्रसिद्ध गायक जोहराबाई अंबालेवाली यांच्याशी जोडला गेला होता. इंडस्ट्रीमध्ये त्याचे चांगले कॉन्टॅक्टस् होते. माझ्या आईला मात्र मला मोठी अभिनेत्री बनवायचं होतं.
डेझी यांनी एका मराठी सिनेमातून करिअरला सुरूवात केली होती. त्यांनी नया दौर, जागते रहो, बूट पॉलिश आणि धूल का फूल यांसारख्या ५० हून अधिक सिनेमांत काम केलंय. अधिकांश सिनेमांत त्यांनी एका मुलाची भूमिका साकारली होती. राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद, वैजयंती माला, मीना कुमारी यांच्यासोबतही त्या मोठ्या पडद्यावर झळकल्यात. डेझी शेवटचं शाहरुख खानसोबत 'हॅप्पी न्यू ईअर' या सिनेमात दिसल्यात.