ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.

Updated: Aug 15, 2019, 02:27 PM IST
ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन  title=

मुंबई : अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आणि एक काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन झालं आहे. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना जीवनरक्षक प्रणाली अर्थात व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. पण, त्यांची तब्येत खालावली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

अमोल पालेकर यांच्यासोबतचा त्यांचा 'छोटी सी बात' हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष आवडीचा. त्याशिवाय 'रजनीगंधा', 'तुम्हारे लिए', 'पती, पत्नी और वो', 'सफेद झूठ', 'मुक्ती' यांसारख्या चित्रपटांतूनही त्या झळकल्या होत्या. 

'ठंडे ठंडे पानी से नाहाना चाहिये' या संजीव कुमार यांच्यासोबतच्या गाण्यामुळेही त्या चर्चेत आल्या होत्या. सत्तरीच्या दशकात प्रेक्षकांवर त्यांनी विशेष छाप पाडली होती. 'राजा काका' या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं. पण, तो चित्रपट त्यांना फारशी ओळख देऊ शकला नाही. त्यानंतर आलेल्या 'रजनीगंधा' या चित्रपटामुळे मात्र कलाविश्वाला एक नवा आणि हसरा चेहरा गवसला होता. 

हिंदी चित्रपटसृष्टीत काही वर्षे प्रसिद्धीझोतात आल्यानंतर त्या जवळपास ८० च्या दशकात परदेशात स्थायिक झाल्या. बराच काळ रुपेरी पडद्यापासून दूर राहिलेला हा चेहरा काही वर्षांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या सलमान खानची मुख्य भूमिका असणाऱ्या 'बॉडीगार्ड' या चित्रपटातून चित्रपट जगतात परतल्या होत्या. फक्त चित्रपटच नव्हे, तर कारकिर्दीच्या दुसऱ्या पर्वात त्यांनी 'चंद्र नंदिनी', 'कुल्फी कुमार बाजेवाला', 'कबूल है' अशा मालिकांमध्येही भूमिका साकारली होती. आपल्या कारकिर्दीत प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या अभिनेत्रीचं जाणं हे सर्वांच्याच मनाला चटका लावणारं आहे.