मुंबई : ज्येष्ठ गायिका लगात मंगेशकर यासुद्धा Coronavirus कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये सहभागी झाल्या आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यांनी मदतस्वरुपात काही रक्कम देत आपली सामाजिक जबबादारी पार पाडली आहे. ट्विट करत त्यांनी याविषयीची माहिती दिली.
जगभरात कोरोना विषाणूनं थैमान घातलेलं असतानाच भारताततही त्याच पार्श्वभूमीवर सध्या चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रत्येकजण खबरदारीनं वागत आहे. पण, तरीही संघर्षाचे हे दिवस काही केल्या संपण्याचं नाव घेत नाही आहेत.
कोरोनाशी सुरु असणारा हाच लढा पाहता उद्योजक, कलाकार मंडळी आणि सर्वसामान्यांपासून प्रत्येकानेच आपल्या परीने कोरोनाविरोधातील या लढाईमध्ये आपलं योगदानदेण्यास सुरुवात केली आहे. यातच लतादीदींनीही पुढाकार घेतला आहे.
'नमस्कार. आपण आपल्या सरकारला या कठीण प्रसंगी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी माझ्यातर्फ़े मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये देत आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सरकारच्या क़ोरोना विरोधी लढ्यात आपण सुद्धा सरकारला यथाशक्ति मदत करावी', असं ट्विट त्यांनी केलं. हे ट्विट करत असताना दीदींनी इतरांनाही या कठीण प्रसंगी मदतीता हात पुढे करण्याचं आवाहन केलं.
नमस्कार.आपण आपल्या सरकारला या कठिण प्रसंगी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी माझ्या तर्फ़े मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये देत आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सरकारच्या क़ोरोना विरोधी लढ्यात आपण सुद्धा सरकारला यथाशक्ति मदत करावी.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) March 31, 2020
सध्याच्या घडीला सर्व स्तरांतून कोरोना विरोधातील या लढ्यात मदतीचा ओघ सुरु झाला आहे. वैद्यकीय उपकरणं, अत्यावश्यक सेवा आणि आर्थिक स्वरुपात अनेकांनी ही मदत करण्यास सुरुवात केली आहे. एकंदरच परिस्थितीचं गांभीर्य पाहता आणि समाजाप्रती आपली जबाबदारी पाहता सर्वजण कोरोनाशी लढा देण्यासाठी एकवटले आहेत हेच खरं.