मुंबई : झी टॉकीज आणि प्रेक्षक यांच्यातील नातं दिवसेंदिवस उत्तमोत्तम सिनेमाच्या प्रदर्शनामुळे चांगलेच बहरत आहे. आता पुन्हा एकदा झी टॉकीज वाहिनी प्रेक्षकांसाठी गाजलेल्या सिनेमांची पर्वणी घरबसल्या घेऊन आली आहे. प्रेक्षकही झी टॉकीज वर आता कोणत्या सिनेमांचा सीझन पाहायला मिळणार यासाठी कायम उत्सुक असतात . ही उत्सुकता लवकरच संपणार असून झी टॉकीज प्रेक्षकांसाठी रविवार १ ऑक्टोबरला 'घर बंदूक बिर्याणी' हा हटके विषय असलेला सिनेमा दाखवणार आहे . दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता हा सिनेमा पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे .
मराठी सिनेसृष्टीत नेहमीच प्रयोगशील मेजवानी देणारे निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे, सैराट या सिनेमापासूनच तरुणाईला वेड लावणारा अभिनेता आकाश ठोसर आणि आपल्या रावडी थाटात खलनायक गाजवणारे अभिनेते सयाजी शिंदे असा त्रिवेणी संगम असलेला 'घर बंदूक बिर्याणी' रविवार १ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय .
नावापासूनच चर्चेच्या शिखरावर पोहोचलेल्या 'घर बंदूक बिर्याणी' या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच हवा निर्माण केली होती . हेमंत अवताडे यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला हा चित्रपट एकमेव असा मराठी चित्रपट आहे जो एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. नागराज मंजुळे, सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर यांच्या अभिनयाची जुगलबंदी या सिनेमाचा ट्रिगर पॉईंट आहे . या त्रिकूटासोबत सायली पाटील हा नवीन चेहराही आकाश ठोसर सोबत या चित्रपटात पाहायला मिळाला. एका साध्या सरळ विषयाची अत्यंत उत्कंठावर्धक मांडणी असलेला 'घर बंदूक बिर्याणी' हा नक्कीच एक वेगळा प्रयोग आहे. ॲक्शन, इमोशन, रोमान्स या मनोरंजनाच्या मसाल्यासोबतच सामाजिक भाष्याचा तडका असा रसभरीत मेन्यूच प्रेक्षकांसमोर ठेवलाय.
जशी बिर्याणी त्यातल्या वेगवेगळ्या जिन्नसांमुळे चविष्ट बनते त्याचप्रमाणे 'घर बंदूक बिर्याणी' हा सिनेमा पण संवाद, गाणी, अभिनय, दिग्दर्शन, कथा अशा सगळ्याच जिन्नसांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता . थिएटर मध्ये या सिनेमाने प्रेक्षकांना खेचून आणण्यात बाजी मारली. आता छोट्या पडद्यावर झी टॉकीज वाहिनी हा सिनेमा खास प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे . गणेशोत्सवा नंतर थोडे रिलॅक्स झालेल्या प्रेक्षकांना 'घर बंदूक बिर्याणी' हा सिनेमा नवी ऊर्जा देण्यासाठी सज्ज आहे . नागराज मंजुळे, सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर या तिघांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा एकमेकांशी कसा मिलाफ होतो आणि त्यातून या तिघांच्याही आयुष्यात नेमक्या कोणत्या रंजक गोष्टी घडतात याचा आनंद घेण्यासाठी झी टॉकीजवर 'घर बंदूक बिर्याणी' हा चित्रपट रविवार १ ऑक्टोबरला चूकवू नका.