Ind vs Pak सामन्यादरम्यान हरवला सोन्याचा आयफोन; उर्वशी रौतेलाने मदत मागताच नेटकरी म्हणाले 'पंतनेच...'

Urvashi Rautela : शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला सपोर्ट करण्यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गेली होती. मात्र यावेळी तिच्यासोबत विचित्र प्रकार घडला आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 15, 2023, 03:56 PM IST
Ind vs Pak सामन्यादरम्यान हरवला सोन्याचा आयफोन; उर्वशी रौतेलाने मदत मागताच नेटकरी म्हणाले 'पंतनेच...' title=

IND vs PAK : आयसीसी विश्वकप 2023 (ICC World Cup 2023) स्पर्धेत शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) खेळवल्या गेलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामान्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. एक लाखांपेक्षा अधिक क्रिकेट चाहत्यांनी हा सामना पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये हजेरी लावली होती. मात्र हा सामना खेळापेक्षा स्टेडिअममध्ये घडलेल्या विविध घटनांमुळेच चर्चेत आला आहे. या सामन्याला अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. यामध्ये उर्वशी रौतेलाचाही (Urvashi Rautela) समावेश होता. मात्र यावेळी तिच्यासोबत विचित्र प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर तिने याबाबत माहिती दिली आहे. मात्र लोकांनी तिलाच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला शनिवारी भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचली होती. सुंदर निळ्या रंगाचा ड्रेस घालून उर्वशी भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियमवर आली होती. मात्र यावेळी तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. सामन्यावेळी उर्वशी रौतेलाचा सोन्याचा आयफोन इथे हरवला आहे. उर्वशी रौतेलाने सोशल मीडिया साईट एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करून चाहत्यांना याची माहिती दिली आहे. यासोबत उर्वशीने लोकांना आवाहन केले आहे की जर कोणाला तिचा फोन सापडला तर त्यांनी कृपया परत करावा.

उर्वशीने मागितली मदत

उर्वशी रौतेलाने ट्विटरवर याबाबत पोस्ट केली आहे. "अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये माझा 24 कॅरेट रिअल गोल्ड आयफोन हरवला आहे. जर कोणाला तो सापडला तर कृपया मदत करा. लवकरात लवकर माझ्याशी संपर्क साधा," असे उर्वशीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. उर्वशी रौतेलाने तिच्या पोस्टमध्ये अहमदाबाद पोलिस आणि मोदी स्टेडियमला ​​टॅग केले आहे. त्याला अहमदाबाद पोलिसांनी "मोबाइल फोनचे तपशील शेअर करा", असं उत्तर दिलं आहे.

या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी उर्वशी रौतेलाला दिलासा देणारी उत्तरे दिली आहेत. मात्र बऱ्याच लोकांनी तिलाच ट्रोल केलं आहे. एका यूजरने ट्विट केले की, "मग यात माझा फायदा काय, मला काय मिळणार आहे?" असं म्हटलं आह. दुसऱ्या एका यूजरने, तूला तिथे जायला कोणी सांगितले? होते असा सवाल केला आहे. एका यूजरने तर, ही बहीण लक्ष वेधण्यासाठी काहीही करते, असं म्हटलं आहे. तर एका चाहत्याने, पंत घेऊन गेला आहे का ते पाहू, असं उत्तर दिलं आहे.

उर्वशी रौतेलाचा व्हिडिओ व्हायरल 

उर्वशी रौतेलाचे क्रिकेटवरील प्रेम नेहमीच दिसून आले आहे. त्यामुळेच शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्या विश्वचषक सामन्यादरम्यान उर्वशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दिसली होती. उर्वशीने पुन्हा एकदा तिची क्रिकेटची आवड लोकांना दाखवली आहे. उर्वशी रौतेलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर स्टेडियममधील नवीनतम व्हिडिओ शेअर केला आहे.