मुंबई : साकीनाका इथे राहणाऱ्या ६५ वर्षीय अब्दुल गनी अहमद खान यांनी आपली कवळी गिळली. अखेर डॉक्टरांनी जटील शस्त्रक्रिया करून ही कवळी बाहेर काढण्यात यश आलं आहे. आपण कृत्रिम दात लावले असतील तर सावध रहा. हे कृत्रिम दात निघून ते अन्ननलिकेत अडकून आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. 65 वर्षीच्या अब्दुल गणी यांचा एक दात पडला म्हणून त्यांनी त्या जागेवर एक कृत्रिम दात असलेली कवळी लावली.रोज रात्री ही कवळी काढून सकाळी लावतात.
मात्र एकेदिवशी नाष्टा करताना नकळत ही कवळी त्यांनी गिळली. डॉक्टरांनी तपासणी साठी एक्स रे काढला. पण प्लॅस्टीकची असल्याने ही कवळी त्यात सापडली नाही. अखेर सीटी स्कॅनच्या सहाय्याने या कवळीचा शोध लागला. छाती आणि पोटाच्या वरील भागात होत असलेल्या वेदनांमुळे ते हैराण झाले होते. याआधी दुसऱ्या रूग्णालयात एन्डोस्कोपीच्या सहाय्याने कवळी काढण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला खरा. कवळी पोटात अडकून ४८ तास उलटले होते. त्यामुळे डॉक्टरांची चिंताही वाढली होती. अखेर २ तासांचं गुंतागुंतीचं ऑपरेशन करून डॉक्टरांनी तब्बल ६ सेंटीमीटरची ही कवळी बाहेर काढली.
रुग्ण अब्दुल यांचे वयही जास्त होतं. त्यामुळे झेन रुग्णालयाच्या डॉक्तरांपुढे मोठे आवाहन होतं. डॉक्टर रॉय पाटणकर आणि डॉक्टर तन्वीर मजीद यांनी ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी केली.त्यासाठी अब्दुल गणी यांनी अन्ननलिका कापून ती पुन्हा जोडण्यात आली. रुग्णाचं वय जास्त असल्याने डॉक्टरांसमोर आव्हान होतं. मात्र कौशल्याने त्यांनी हे आव्हान पेललं. आता गणी यांची तब्येत सुधारत आहे.