एखादी महिला गर्भवती (Pregnancy) असतानाच पुन्हा गर्भवती झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? आता हे कसं काय शक्य आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. पण इंग्लंडमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये एका महिलेने चार आठवड्यांच्या अंतराने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ही महिला गर्भवती असतानाच पुन्हा एकदा गर्भवती झाली होती. चार आठवड्यांच्या अंतराने महिलेची पुन्हा गर्भधारणा झाली आणि तिने जुळ्या बाळांना जन्म दिला.
'द सन'च्या रिपोर्टनुसार, एका असामान्य आणि दुर्मिळ प्रकरणात महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. या दोन्ही मुलींमध्ये चार आठवड्याचं अंतर आहे. विशेष म्हणजे गर्भात दोन्ही बाळांचा वेगवेगळ्या आकारात विकास होत होता. स्कॅनिंगमध्ये ही माहिती समोर आली आहे. गर्भात दोन्ही मुलांचा आकार वेगळा होता.
इंग्लंडच्या लेमिनस्टर येथे राहणाऱ्या 30 वर्षीय सोफी स्मॉलला सुपरफिटेशन नावाच्या घटनेबद्दल सांगण्यात आलं. यामध्ये गर्भवती असताना पुन्हा एकदा गर्भधारणा होते. सोफीने सांगितल आहे की "सतत डोकं दुखत असल्याने मी गर्भवती असल्याचा मला अंदाज आला होता. पण विश्वास नसल्याने आम्ही प्रयत्न सुरु ठेवला होता".
मेडिकल लिटरेचरमध्ये सुपरफिटेशनच्या काही घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. ही प्रकरणं खासकरुन त्या महिलांशी संबंधित आहेत ज्यांनी विट्रो फर्टिलायजेशन (IVF) सारखे उपचार घेतले आहेत.
एखादी महिला गर्भवती असतानाच पुन्हा एकदा गर्भवती होते तेव्हा त्या अवस्थेला सुपरफिटेशन म्हणतात. तुमची पहिली प्रेग्नेंसी सुरु झाल्यानंतर काही दिवसांनी किंवा एका महिन्यानंतर जेव्हा तुमचा एग्स स्पर्मच्या संपर्कात येतो तेव्हा तो फर्टिलाइज होते. यामुळे दुसरी प्रेग्नेंसी सुरु होते. अनेकदा जुळी मुलं सुपरफिटेशनपासून जन्माला येतात. हे अनेकदा एकत्र किंवा एका दिवशी जन्माला येतात. सुपरफिटेशनमध्ये, गर्भवती महिलेचं एग फर्टिलाइज होऊन गर्भाशयात स्वतंत्रपणे प्रत्यारोपित होतो.
अशी प्रकरणे काही प्रमाणात अपवादात्मक किंवा दुर्मिळ मानली जातात, कारण त्यासाठी तीन संभाव्य घटना एकाच वेळी घडणे आवश्यक असते. प्रथम म्हणजे अंडाशयाला दुसरे अंडे किंवा ओव्हम सोडावे लागते, जे सहसा होत नाही. दुसरे शुक्राणू पेशीसह त्या अंड्याचे फलित करा. हेदेखील अशक्य आहे कारण गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात शुक्राणूंचा मार्ग रोखला जातो. आणि तिसरे गर्भाशयात फलित अंडाचे रोपण करणे, जिथे आधीच एक भ्रूण आहे.
जर या अशक्य गोष्टी झाल्या तर एकाच वेळी दोन गर्भधारणा होऊ शकतात. पण यावेळी भ्रूणांचं वय वेगळं असतं. म्हणजेच दोन्ही बाळांचा विकास वेगवेगळ्या टप्प्यात होईल. त्यामुळे ही जुळी मुलं इतरांपेक्षा वेगळी असतात.
सोफी आधीच एका मुलाची आई आहे. आपल्या गर्भात दोन मुलं आहेत याची आपल्याला कल्पना नव्हती असं तिने सांगितलं आहे. मी डार्सीला जन्म देत असताना फार त्रास झाला. सात आठवड्यात आठ वेळा मला रुग्णालयात दाखल करावं लागलं असं तिने सांगितलं आहे.
"डॉक्टरांनाही मी इतकी आजारी का पडत आहे हे समजत नव्हतं. सातव्या आठवड्यात स्कॅन केलं असता त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं. मला जुळी मुलं होणार होती. पण एक मूल दुसऱ्यापेक्षा मोठं होतं. काहीतरी अनपेक्षित जाणवत होतं," असं तिने सांगितलं आहे.