Foods you should avoid eating with milk: मानवी आरोग्यावर दैनंदिन आयुष्यातील अनेक सवयींचा थेट परिणाम होताना दिसतो. यामध्ये आहाराच्या सवयी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसतात. त्यातलीच एक सवय म्हणजे दूध पिण्याची. दुधाचा एक ग्लासही शरीरासाठी किती महत्त्वाचा असतो हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण, जाहिराती असो किंवा मग आणखी काही प्रत्येक माध्यमातून आपल्याला लहानपणापासूनच दूध कसं फायदेशीर हे सांगितलं जातं. पण, दुधासोबत काय खाऊ नये हे तुम्हाला कोणी सांगितलं आहे का?
असेलही. पण, यातून काही गोष्टी निसटल्याच असतील. त्यामुळे आज आपण पुन्हा एकदा दुधासोबत नेमकं काय खाऊ नये, यावर नजर टाकणार आहोत. मुख्य म्हणजे हे 5 पदार्थ दुधासोबत खाल्ल्यास त्यामुळं तुमच्या शरीराला मोठं नुकसान पोहोचू शकतं.
मासे
मत्स्याहाराच्या सेवनाचे तसे बरेच फायदे. पण, दुधासोबत कधीच मासे खाऊ नयेत. असं केल्यास Food Poisoning चा त्रास भेडसावतो. पोटाचे विकार, त्वचेची अॅलर्जी आणि अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
आंबट फळं
दुध आणि आंबट फळांचं एकत्र सेवन केल्यास अपचन, उलटी अशा समस्या तुम्हाला हैराण करु शकतात.त्यामुळं तुम्ही जर एखादं आंबट फळ किंवा तत्सम वस्तू खात आहात तर त्यानंतर 2 तासांनी दूध प्या.
उडदाची डाळ
दुझासोबत किंवा त्यानंतर फार कमी वेळातच उडदाची डाळ किंवा त्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाल्ल्यास शरीराला त्यामुळं नुकसान पोहोचतं. यामुळं उलटी, शरीर जड वाटणं, पोटदुखी, घुसमट होणं अशा अनेक समस्या त्रास देऊ लागतात. त्यामुळं उडदाच्या डाळीच्या सेवनानंतर किमान दोन तास तरी दूध पिऊ नका.
फणस
दूध प्यायल्यानंतर लगेचच फणस खाऊ नका. यामुळं त्वचा आणि पोटाचे विकार बळावतात. दूध आणि फणस या एकत्र खाण्याच्या गोष्टी नाहीत. त्यांचं एकत्रितपणे सेवन केल्यास सोरायसिस, खरुज यांसारखे त्वचारोग उदभवतात.
दही
दही आणि दूध हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी कितीही हितकारक असले तरीही त्यांचं एकत्रितरित्या सेवन करु नये. अशानं पोटदुखी, अपचन आणि अस्वस्थता या समस्या त्रास देऊ लागतात.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )