'या' रूग्णांसाठी बूस्टर डोस ठरणार फायदेशीर; अभ्यासकांचा दावा

अमेरिकेमध्ये तिसरा म्हणजेच बूस्टर डोसाला परवानगी देण्यात आलेली आहे.

Updated: Aug 14, 2021, 10:03 AM IST
'या' रूग्णांसाठी बूस्टर डोस ठरणार फायदेशीर; अभ्यासकांचा दावा title=

मुंबई : नुकतंच अमेरिकेमध्ये तिसरा म्हणजेच बूस्टर डोसाला परवानगी देण्यात आलेली आहे. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या आणि अवयव प्रत्यारोपण झालेल्या नागरिकांना हा डोस देण्यात येणार असल्याचं सांगितलंय. तर अवयव प्रत्यारोपण झालेल्या रूग्णांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस फायदेशीर ठरू शकतो, असं एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे. 

कॅनेडियन शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, अवयव प्रत्यारोपण झालेल्या रूग्णांनी बूस्टर डोस घेतला तर त्यांच्या अँटीबॉडी प्रतिसाद वाढू शकतो. बूस्टर डोस हा लसीचा अतिरिक्त डोस आहे, ज्याचा उद्देश विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती राखणं असा आहे.

या अभ्यासात, अवयव प्रत्यारोपण झालेल्या 120 लोकांवर ही चाचणी करण्यात आली. पूर्ण लसीकरण झालेल्या अशा लोकांना दोन गटात विभागलं गेलं. यापैकी कोणताही रुग्ण यापूर्वी कोरोना विषाणूच्या संपर्कात आला नव्हता. एका गटाला कोविड लसीचा तिसरा डोस देण्यात आला तर दुसऱ्या गटाला सलाईन दिलं गेलं. 

प्राथमिक चाचणी व्हायरस स्पाइक प्रोटीन विरूद्ध 100 U/ml पेक्षा जास्त अँटीबॉडीजची पातळी असल्याचं लक्षात आलं. संशोधकांना असं आढळलं, की ज्यांनी तिसरा डोस घेतला त्यांच्यामध्ये अँडीबॉडी प्रतिसाद 55 टक्के होता आणि ज्यांनी घेतला नाही त्यांच्यामध्ये तो फक्त 18 टक्के होता.

न्यू इंग्लंड जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटलंय की, "पहिल्या आणि दुसऱ्या चाचण्यांत, अवयव प्रत्यारोपण झालेल्यांमध्ये mRNA लसीचा तिसरा डोस प्लेसबोपेक्षा अधिक प्रभावी असल्याचं दिसून आलं. हे क्लिनिकल निकालासाठी पुरेसं नसून यावर अजून चाचण्या करण्यात येतील.”

भारतात देखील बूस्टर डोसचा विचार केला जातोय

नीति आयोगाचे सदस्य डॉ व्ही. के. पॉल म्हणाले की, कोविड 19 लसीकरणावर राष्ट्रीय तज्ज्ञ गटाने बूस्टर डोस देण्याचा विचार केला आहे. यासंदर्भात खूप खोलवर तपासणी केली जातेय.