पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : नागपुरात सुपर स्पेशलिटी डॉक्टरांनी किमया करुन दाखवली आहे. ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन या डॉक्टरांनी चक्क रुग्णाला शुद्धीवर ठेवत केले. तेही सरकारी रुग्णालयात. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्णाची प्रकृती देखील स्थिर आहे. डॉक्टरांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन म्हटलं की ऐकूनच रुग्ण गर्भगळीत होत असतो. मात्र, नागपुरातल्या डॉक्टरांनी एक ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन रुग्णाला शुद्धीत ठेवून केले. विशेष म्हणजे कोणत्याही सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन करण्यात आलं नाही. तर, सरकारी रुग्णालयात हे ऑपरेशन पार पडलं. मेंदू विकार उपचार विभागातील डॉक्टर प्रमोद गिरी आणि डॉक्टर संजोग गजभिये यांच्या टीमने रुग्णाला शुद्धीवर ठेवत अतिशय कठीण अशी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली आणि एक नाही तर तब्बल दोन रुग्णांच्या मेंदूतील ट्युमर यशस्वीरित्या काढण्यात यश मिळवलं.
मध्यप्रदेशातील 20 वर्षीय तरुण मिथिलेश गौतम आणि नागपुरातील 30 वर्षीय महिला रेखा या दोघांनाही डोकेदुखीचा त्रास होता. अनेक खाजगी रुग्णालयात उपचाराचा प्रयत्न केल्यानंतर हे दोघेही उपचाराकरीता सुपर स्पेशलिटी रुग्णालयात पोहचले. तिथे त्यांना ब्रेन ट्युमर असल्याचे निदान झाले. सुपरच्या डॉक्टरांनी त्यांना ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. त्याकरता दोन्ही रुग्णांना डॉक्टरांनी मानसिकरित्या तयार करत शस्त्रक्रिये करता तयार केले. अतिशय जटिल अशा या शस्त्रक्रियेत रुग्णांची बोलण्याची क्षमता जाण्याची भीती असते. त्यात रुग्णांना शुद्धीवर ठेवत केवळ शस्त्रक्रियेसाठी आवश्यक क्षेत्र बधिर करत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची ''अवेक क्रीनोऑटॉमी''पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरता रुग्णांना शस्त्रक्रियेपूर्वी समुपदेशन करण्यात आले.
शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला वेदना होऊ नये म्हणून डोक्यातील नसांना बाधिर करत रुग्णांशी संवाद साधत डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली आणि दोन्ही रुग्णांचा ट्यूमर काढला. महत्त्वाचं म्हणजे त्यांची बोलण्याची क्षमता जशीच्या तशी राहील याबाबतही डॉक्टर पूर्णपणे दक्ष होते आणि यशस्वी राहिले.
अतिशय जटिल अशा या शस्त्रक्रियेत रुग्णांची बोलण्याची क्षमता जाण्याची भीती असते. त्यात रुग्णांना शुद्धीवर ठेवत केवळ शस्त्रक्रियेसाठी आवश्यक भाग बधीर करत 'अवेक क्रीनोऑटॉमी' पद्धतीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला वेदना होऊ नये म्हणून डोक्यातील नसांना बाधिर करत रुग्णांशी संवाद साधत डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली आणि दोन्ही रुग्णांचा ट्यूमर काढला. दोन्ही रुग्णांची बोलण्याची क्षमता उत्तम आहे आणि ते आता घरीही परतले आहेत.
ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया अत्यंत संवेदनशील असते. मेंदू, कान, डोळे, वाचा या प्रत्येक क्रियेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. अंतर्गत रक्तस्त्रावाचा सर्वाधिक धोका असतो. अशी अवघड शस्त्रक्रिया रुग्णाला भूल न देता पार पडली. एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ही किमया पार पाडण्यात आली हे आणखी विशेष.