कोरोनाचा डेल्टा स्ट्रेन ठरतोय धोकादायक; कोरोना रूग्णांमध्ये दिसतेय 'ही' समस्या

कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.

Updated: Jun 9, 2021, 05:37 PM IST
कोरोनाचा डेल्टा स्ट्रेन ठरतोय धोकादायक; कोरोना रूग्णांमध्ये दिसतेय 'ही' समस्या title=

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका देशभरातील अनेकांना बसला. आता दुसऱ्या लाटेचा परिणाम कमी होताना दिसतोय. नव्या कोरोना प्रकरणांमध्येही आता घट होताना दिसतेय. दरम्यान कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. दरम्यान डॉक्टर आता कोरोनाच्या डेल्टा स्ट्रेनचा धोका जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत.

डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, डेल्टा स्ट्रेनने संक्रमित झालेल्या कोरोनाच्या रूग्णांमध्ये ऐकू येण्याची क्षमता कमी झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोटाच्या समस्या, ब्लड क्लॉट्स, गँग्रीन यांसारखी लक्षणं ही दिसून आली आहेत. 

यासंदर्भात माहिती देताना मुंबईतील केईएम रूग्णालयातील असोसिएट प्रोफेसर आणि युनिट हेड डॉ. नीलम साठ्ये म्हणाल्या, "कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांमध्ये कमी ऐकू येण्याची समस्या दिसून येतेय. आमच्याकडेही असे काही रूग्ण पहायला मिळालेत. मुख्य म्हणजे व्हायरस हा शरीरातील इतर भागांवरही परिणाम करतो. तसंच हा व्हायरस ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करत असल्याचं दिसून येतंय." 

कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करणाऱ्या देशभरातील 6 डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच कोरोनाच्या रूग्णांमध्ये पोटदुखी, उल्टी, भूक कमी लागणं, ऐकू येण्याची क्षमता कमी होणं तसंच सांधेदुखीचा त्रास होतं असल्याचं समोर आलंय. भारत सरकारच्या पॅनलने नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार, भारतात दुसऱ्या कोरोना लाटेच्या मागे डेल्टा वेरियंट जबाबदार आहे.