मुंबई : आज 1 जुलै...म्हणजेच जागतिक डॉक्टर दिन...सध्या कोरोनाच्या संकटकाळात स्वतःच्या जीवाचीही परवा न करता देशभरातील डॉक्टरांनी रूग्णांची अविरतपणे सेवा केली आहे. तर आज डॉक्टर दिनाच्या निमित्ताने राज्यातील कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांच्याशी संवाद साधला आहे. यावेळी डॉ. ओक यांनी राज्यात येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात माहिती दिली आहे.
झी 24 तासशी बोलताना डॉ. संजय ओक म्हणाले, "कोरोनाची तिसरी लाट कधीच येऊ नये असं वाटतं. लसीकरण मोहिमेला आपण किती पुढे नेतो आणि समाज याबाबत किती प्रभल्भतेने वागतो यावर परिस्थिती अवलंबून आहे. यामध्ये मास्कचा वापर, शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम करणं या पद्धतीने जर आपण वागलो त्याचसोबत लसीकरण सुरु राहिलं तर कदाचित तिसरी लाट येणारच नाही."
डॉ. ओक पुढे म्हणाले, तिस-या लाटेत मुलांना कोरोना झाला तरी गंभीर रूप धारण करणार नाही.मुलांमध्ये थायमस नावाची एक ग्रंथी असते. ती आकाराने मोठी असते. तिच्यातून तयार होणा-या अँटीबॉडीज अनेक व्हायरसचा प्रतिकार करण्यात यशस्वी होतात असंही, डॉ. संजय ओक यांनी म्हटलंय.