कोरोना व्हायरसमुळे चीनमधून भारतात येण्यासाठी ई-व्हीसा सेवा बंद

फिलिपीन्समध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू   

Updated: Feb 3, 2020, 11:31 AM IST
कोरोना व्हायरसमुळे चीनमधून भारतात येण्यासाठी ई-व्हीसा सेवा बंद

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. दिवसागणिक या व्हायरसमुळे मृतांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. कोरोनाने आतापर्यंत एकूण ३६० पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. शिवाय संपूर्ण देशभरात १७ हजार लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. यामुळे भारत सरकारने खबरदारी म्हणून चीनी पासपोर्ट धारकांचा ई-व्हिसा रद्द केला. रविवारी परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोना व्हायरसची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. फिलिपीन्समध्ये कोरोना व्हायरसमुळे ४४ वर्षीय पहिल्या रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर भारतात कोरोनाचे २ रूग्ण अढळले आहेत. केरळमधील दुसऱ्या रुग्णाला चाचण्यांअंती कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी चीनला जाऊन आलेली. त्यानंतर आता या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. 

अमेरिकेत देखील ८ लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यासंबंधतीत माहिती दिली आहे. तर सध्या चीनमध्ये कोरोनाच्या रूग्णांसाठी दोन दिवसांत नवं रूग्णालय उभारलं आहे. या रूग्णालयात १ हजार बेडची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. 

कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव लक्षात घेत जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणी घोषित केली आहे. देशात या विषाणूच्या लागणीचे नमुने तपासण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद समन्वयाने काम करणार आहेत. सध्या जगातील विविध प्रयोगशाळांमध्ये कोरोना व्हायरसवर अधिक अभ्यास सुरू आहे.