मुंबई : कडक उन्हानंतर सध्या मुंबईसह राज्यभरात ब-याच ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येतंय. कोकणात आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडला आहे. या बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांची जळजळ तसंच खोकला हे आजार बळावू शकतात. हवामानात होणा-या वारंवार बदलामुळे प्रतिकार शक्ती कमी होऊन साथीच्या आजारांना आपलं शरीर बळी पडू शकतं, असं डॉक्टरांनी सांगितलंय.
हे आजार टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणं, अंगावर ताप काढणं टाळणं, बाहेरचे खाद्यपदार्थ खाणं टाळणं, तसंच उन्हात जाताना काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलंय. लहान मुलं आणि वृद्धांची विशेष काळजी घेणंही गरजेचे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.
ढगाळ वातावरणाचा परिणाम पुढले ३ ते ४ दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे पिकांवर विषेशतः कोकणात आंब्यावर तुडतुड्या आणि बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी, शेतक-यांनी कृषी विद्यापीठानं सूचना केल्यानुसार औषधांची फवारणी करण्याचं आवाहन रायगड जिल्हा कृषी अधिका-यांनी केलं आहे.