फास्टफूड खाताय तर व्यायाम करा...नाही तर

फास्ट फूड खाणाऱ्यांची संख्या वाढलीय. भूक लागली म्हणून पिझ्झा बर्गर खाल्ला यापेक्षा फॅशन म्हणून आजकाल पिझ्झा बर्गर

Updated: Dec 16, 2019, 09:05 PM IST
फास्टफूड खाताय तर व्यायाम करा...नाही तर title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : फास्ट फूड खाणाऱ्यांची संख्या वाढलीय. भूक लागली म्हणून पिझ्झा बर्गर खाल्ला यापेक्षा फॅशन म्हणून आजकाल पिझ्झा बर्गर आणि फ्रेंच फ्राईज खाल्ल्या जातात. पण फास्ट फूड खाल्ल्यानं तरुणाईत लठ्ठपणा वाढतो. जर तुम्हाला फास्ट फूड खाऊन त्याचे दुष्परिणाम नको असतील तर तेवढा व्यायामही करणं गरजेचं आहे. 

इंग्लंडमधील लॉफबर्ग विद्यापीठानं केलेल्या एका अभ्यासाअंती तुम्ही फास्ट फुड खाल्ल्यावर किती व्यायाम करायला हवा याची यादीच जाहीर केलीय़. 

तुम्ही जर एक पिझ्झा खाल्ला तर त्यातील कॅलरी बर्न करण्यासाठी तुम्ही ४ तास धावलं पाहिजे. तुम्ही ५०० मिली पिनट बटर खाल्ल्यावर अडीच तास धावलं पाहिजे. ११० ग्रॅम चॉकलेट खाल्ल्यावर १ तास धावलं पाहिजे. 

चिकन सँडविच खाल्ल्यावरही तुम्ही एक तास धावलं पाहिजे. १ लिटर कोल्ड ड्रिंक प्यायल्यावर ३० मिनिटं धावायला पाहिजे. चिप्स खाल्ल्यावर २० मिनिटं धावणं गरजेचं आहे. एक कप चहा प्यायल्यानंतर ६ मिनिटं चालणं गरजेचं आहे. 

हल्लीच्या तरुणाईसाठी फास्ट फूड खाणं खूप सोप्पं आहे. पण व्यायामाला त्यांच्याकडं वेळ नाही.

फास्ट फूड खाल्लं तर किती व्यायाम करावा हा तक्ता दिसायला बरा वाटतो. पण तो कुणालाही पाळता येणार नाही. त्यामुळं शक्यतो फास्ट फूडच टाळावं असा सल्ला डॉक्टर देतात.

फास्ट फूडमुळे लोकांमध्ये लठ्ठपणा वाढत चाललाय. सध्या जगात १५ कोटी मुलं आणि तरुणाई लठ्ठपणाच्या विळख्यात सापडलीय. 

फास्ट फूड खाणं असंच सुरू राहिलं तर येत्या १० वर्षात लठ्ठपणाच्या विळख्यात जवळपास २५ कोटी लोकं सापडतील अशी भीती व्यक्त केली जातेय. त्यामुळं शक्यतो फास्ट फूडपासून लांबच राहा.