मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या बाबतीत नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमातून कौमार्य चाचणी हा विषय काढून टाकण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत आक्षेप घेतला होता. या अक्षेपानंतर हा विषय आता वैद्यकीय अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बलात्कार पिडीत महिलांची कौमार्य चाचणी कशी घ्यावी याचा एक भाग वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवला जात होता. मात्र यानंतर अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी एक निवेदन करत याबाबत आक्षेप घेतला. त्याचप्रमाणे हा विषय वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळून टाकण्याची मागणी केली.
एमबीबीएसच्या न्यायवैद्यकशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमात ‘टू फींगर टेस्ट’चा उल्लेख आहे. यामध्ये बलात्कार पीडित स्त्रीच्या गुप्तांगाची बोटाने किंवा प्रोबने तपासणी करून तिच्यावर संभोग झाला आहे का नाही ते ठरवण्यात येतं. यामध्ये स्त्रीच्या कौमार्य पटलाचं माप आणि योनी मार्गाची लवचिकता याचं परीक्षण करण्यात येतं. मात्र ही चाचणी अवैज्ञानिक आणि अशास्त्रिय असल्याचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला.
कौमार्य चाचणीच्या नावाखाली स्त्रीच्या मानवी हक्कांचं उल्लंघन होतं असल्याचं अंनिसचं म्हणणं आहे. कौमार्य चाचणी ही केवळ महिलांची होते. मात्र पुरुषांचा यामध्ये उल्लेख नाही. मुळात कौमार्यता हा खुपच वैयक्तिक विषय आहे.
"वैज्ञानिकदृष्टीकोनातून पाहिलं तर कौमार्य भंग चाचणीचा तसंच चारित्र्याचा काहीही संबंध नाहीये. अनेकदा खेळताना, सायकल चालवताना तसंच व्यायाम करताना गुप्तांगातील पातळ पडदा फाटू शकतो याबाबत शास्त्रीय प्रबोधन समाजात करण्यात येतंय. पण अशा कुप्रथांना उत्तेजन देण्याचं काम आपल्या वैद्यक शास्त्राच्या अभ्यासक्रमातून होत असल्याचं," अंनिसच्या कृष्णा चांदगुडे यांनी सांगितलं आहे.