Maharashtra Politics Ajit Pawar Mother Wish: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अगदी शिर्डीमधील साई मंदिरापासून ते अक्कलकोटपर्यंत सर्वच प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करणाऱ्यांमध्ये काही अति महत्त्वाच्या व्यक्तींचाही समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनीही नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंढरपूरमध्ये देवदर्शन घेतलं. सकाळीच आशा पवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. यावेळेस त्यांनी केलेली एक मागणी सध्याचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप घडवणार की काय अशी चर्चा त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनंतर सुरु झाली आहे.
आशा पवार यांनी आपण श्री विठ्ठल रुक्मिणीकडे सर्वांना सुखी ठेव असे साकडे घातल्याचं सांगितलं. तसेच त्यांनी, 'पवार कुटुंबीय एकत्र यावे अशी इच्छा देवाकडे व्यक्त केली,' असंही सांगितलं. "सगळे वाद संपू दे असं पांडुरंगाला सांगितलं आहे," असं आशा पवार म्हणाल्या. पत्रकारांनी भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावे का? असं अशा पवारांना विचारलं असता त्यांनी, 'होय' असं उत्तर दिलं. पांडुरंग तुमचं ऐकणार? असं पत्रकारांनी विचारलं असता आशा पवार यांनी हात जोडत, "होय, होय ऐकणार," असं सांगितलं.
अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात 'झी 24 तास'शी बोलताना आशा पवारांच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. "ती त्यांच्या मनातली भावना आहे. त्या घरातील सर्वात मोठ्या व्यक्तींपैकी एक आहेत. आदरणीय साहेब (शरद पवारही) जेष्ठ आहेत. सर्व कुटुंब एकत्र असावं अशी आशा काकींची इच्छा आहे. मात्र ती सर्वांची इच्छा हवी. तुतारी गटातील नेते जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांना एकत्र येऊ द्यायचं आहे का? हे महत्त्वाचं आहे. पांडुरंगा चरणी त्यांनी केलेलं साकडं पूर्ण झालं तर सर्वांनाच आनंद होईल. कारण हे दोन्ही नेते महाराष्ट्राला दिशा देणारे आहेत. मात्र काहींना एकत्र येऊ द्यायचं नाहीये. आव्हाडांसारख्या लोकांना एकत्र येऊ द्यायचं नाहीये असं वाटतं," असं मिटकरी म्हणाले.
नक्की वाचा >> '...त्यांना चांगलं फोडून काढा!' राज ठाकरेंनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी मनसैनिकांना दिलं नवं टास्क
आशा पवारांनी व्यक्त केलेल्या इच्छेसंदर्भात विचारलं असता शरद पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनीही आपलं मत नोंदवलं आहे. "एखाद्या माऊलीने अशी प्रतिक्रिया दिली असेल तर आनंदच आहे. कुणाला आपलं घर असं फुटलेलं पाहिजे? पवार साहेबांची आणि अजित पवारांची राजकीय भूमिका वेगळी ठेवली आहे. कुटुंबामध्ये काही क्लेष आहे अशातली गोष्ट नाही," असं महेश तपासे म्हणाले. "राजकीय भूमिका वेगळी असू शकते मात्र कुटुंब एकत्र येत असेल तर त्याहून आनंदाची दुसरी काय गोष्ट असू शकते," असं महेश तपासे म्हणाले आहेत.