Video: ना बिबट्या, ना वाघ.. आंबेगावात विचित्र प्राण्याचा थेट घरात शिरुन हल्ला; तिघे जखमी

Ambegaon Taluka Attacked By Animal: दुपारच्या सुमारास अचानक हा प्राणी मानवी वस्तीत शिरला. त्यानंतर त्याने एका घरात प्रवेश करुन लोकांवर हल्ला केला

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 1, 2025, 11:50 AM IST
Video: ना बिबट्या, ना वाघ.. आंबेगावात विचित्र प्राण्याचा थेट घरात शिरुन हल्ला; तिघे जखमी title=
घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे

Ambegaon Taluka Attacked By Animal: जुन्नर आणि आंबेगाव तालुके हे बिबट्यांचा वावर असणारे तालुके म्हणून ओळखले जातात. अनेकदा बिबट्यांकडून मानवी वस्तीत होणारा शिरकाव आणि केलेल्या हल्ल्यांच्या बातम्या या तालुक्यांमधून समोर येतात. मात्र सध्या समोर आलेली एक बातमी फारच थक्क करणारी आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये वर्षाच्या शेवटच्या दिवशी एका गावात घुसून तरसाने धुमाकूळ घातला आहे.

घटना कॅमेरात कैद

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळील शेवाळवाडी परिसरात हा सारा प्रकार घडला. या तरसाने तिघांना चावा घेत गंभीर जखमी केलं आहे. शेवाळवाडीतील सोंडेमळा येथील एका घरामध्ये दुपारच्या सुमारास अचानक या तरसाने प्रवेश केला. कोणाला काही कळण्याआधीच घाबरलेल्या या तरसाने घरातील तीन सदस्यांना चावा घेतला. हा तरस पळत पळत लोकांचा पाठलाग करत घरात घुसल्याचे दृश्य कॅमेरामध्ये कैद झालं आहे.

वनविभागाची घटनास्थळी धाव

सदर हल्लाची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाने जवळपास एक तास कसरत करुन या तरसाला जेरबंद करण्यात यश मिळवलं. सध्या या हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी रोहन थोरात या तरुणाने नेमका घटनाक्रम सांगताना अचानक घरात तरस शिरला आणि त्याने आमच्यावर हल्ला केला. आम्हाला सावरण्याचा वेळही मिळाला नाही असं जखमींचं म्हणणं आहे. सर्व जखमींवर मंचर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे.

तरस थेट मानवी वस्तीमध्ये कसा शिरला?

हा तरस मानवी वस्तीमध्ये शिरला कसा? असे अजून काही प्राणी या मानवीवस्तीच्या आसपास आहेत का? यासंदर्भातील तपास आता वन अधिकारी करत आहेत. अशाप्रकारे तरसाने थेट घरात घुसून चावा घेतल्याची घटना घडल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. 

या भागात वन्यप्राणी अधिक का?

मागील काही काळापासून आंबेगाव तालुक्यामध्ये बिबट्यांबरोबर तरसांचा वावर वाढला आहे. अनेकदा या भागात तरसांचे दर्शन होते. गावाच्या आसपास अनेकदा तरस भटकताना दिसतात. या भागामध्ये ऊसाचे क्षेत्र अधिक असल्याने येथे तरसांना लपण्यासाठी जागा आहे. नागापूर, थोरांदळे, रांजणी, वळती, पारगाव परिसरामध्ये आता बिबट्यांबरोबरच तरसांचाही वावर वाढला आहे. या भागामध्ये मीना आणि घोड नद्यांना बारा महिने पाणी असल्याने या भागामध्ये बिबटे, तरस, वानर, मोर, लांडगे आणि कोल्हे आढळून येतात. या ठिकाणी अनेक गावांमध्ये वन्य प्राण्यांचा येथे वावर असल्याच्या सूचना देणाऱ्या पाट्या वनखात्याकडून लावण्यात आलेल्या आहेत.