RBI समोर शेंगदाणे विकणाराच 'त्या' घोटाळ्याचा मास्टरमाईंड; हादरवून टाकणारा गौप्यस्फोट

RBI News : देशात आणखी एक हादरवणारा घोटाळा समोर. शेंगदाणे विकणाऱ्याकडे सापडलं घबाड... पाहा नेमकं काय आणि कुठे घडलं...   

सायली पाटील | Updated: Jan 1, 2025, 10:30 AM IST
RBI समोर शेंगदाणे विकणाराच 'त्या' घोटाळ्याचा मास्टरमाईंड; हादरवून टाकणारा गौप्यस्फोट  title=
(छाया सौजन्य- फ्रीपिक AI)/ nagpur news Peanut seller turns out to be the mastermind of the 2000 note exchange gang

RBI News : मागील काही दिवसांपासून देशातील अनेक आर्थिक घोटाळे समोर आले आहेत. यामध्येच महाराष्ट्रातूनही एक घोटाळा प्रकाशात आला असून, तपास यंत्रणांनाही यामुळं हादरा बसला आहे. नागपूरमध्ये नुकतंच पोलिसांनी एका टोळीला ताब्यात घेतलं असून, ही टोळी चलनातून बाद करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या नोटांची अदलाबदल करण्याचं काम करत होती असं सांगितलं जातं. 

8 नोव्हेंबर 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतर केंद्रानं 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या होत्या. 2023 मध्ये 19 मे पासून देशात या नोटांचा वापरही थांबवण्यात आला. ज्यानंतर 2000 च्या नोटा बदलून घेण्याचे निर्देश आरबीआयनं जारी केले. पण, सक्रिय चलनातून या नोटा बाद करण्यात येऊनही काही नोटा मात्र अद्यापही आरबीआयकडे परत आल्या नव्हत्या. याचदरम्यान एक खळबळजनक घोटाळा समोर आला आणि यंत्रणाही हादरल्या. 

धक्कादायक बाब म्हणजे नागपुरमधील रिझर्व्ह बँकेतच या नोटा बदलून दिल्या जात होत्या आणि या साऱ्याचा मास्टरमाईंड होता याच RBI समोर शेंगदाणे विकणारा एक इसम. सदर प्रकरणी पोलिसांनी सापळा रचत चौघांवर अटकेची कारवाई केली. नागपूर शहर पोलिसांनी अटकेच्या कारवाईनंतर दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावं पुढीलप्रमाणे: नंदलाल मौर्य, किशोर बहोरिया, रोहित बावने आणि अनिल जैन. 

हेसुद्धा वाचा : वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रायलकडून हमासच्या म्होरक्याचा खात्मा; घरात घुसून संपवलं आणि...

एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहातच्या बातमीनुसार नंदलाल मौर्य हा आरबीआयसमोरच शेंगदाणे विकत होता. अनिल जैनच्या सांगण्यावरून एक महिला आणि तरुणाच्या मदतीनं तो आरबीआयच्या काऊंटवरून 2000 रुपयांच्या चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटा बदलून त्याऐवजी 500 आणि 200 रुपयांच्या नोटांची व्यवस्था करत होता. या कामासाठी नंदलालला 200 ते 1000 रुपयांची वरकमाई अर्थात कमिशन मिळत होतं. 

सध्याच्या घडीला पोलिसांना आरोपीकडे 2 लाख रुपयांची रोकड सापडली असून, यामध्ये 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणामधीलच आरोपी अनिल जैन हा मुळचा मध्य प्रदेशातील जबलपूरचा रहिवासी असून, तो 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासोबतच नव्या नोटांचाही व्यवहार करत असल्याचं सांगण्यात आलं. 

उत्तर भारताशी काय कनेक्शन? 

नागपूरमधील या घटनेचं उत्तर भारत कनेक्शनही यादरम्यान समोर आलं आहे. या भागामध्ये लग्नसमारंभांदरम्यान नोटांचा हार घालण्यापासून नातेवाईकांना शकुनाची रक्कम म्हणूनही पैसे देण्याची परंपरा आहे. याच बहाण्यानं जैन आणि या रॅकेटमध्ये त्याच्यासोबत असणाऱ्यांनी 10 हजारांच्या कोऱ्या करकरीत नोटा 11 हजार रुपयांना विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता.