व्हॅनिला आईस्क्रिम - उन्हाळ्यात पित्ताचा त्रास कमी करण्याचा नैसर्गिक उपाय

उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उकाडा आपल्याला बेहाल करतो. 

Updated: May 26, 2018, 07:36 AM IST
व्हॅनिला आईस्क्रिम - उन्हाळ्यात पित्ताचा त्रास कमी करण्याचा नैसर्गिक उपाय  title=

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उकाडा आपल्याला बेहाल करतो. अशावेळेस पित्ताचा त्रास होण्याची शक्यता दाट असते.    अतिखाल्ल्याने अ‍ॅसिडीटी किंवा छातीत जळजळणे अशा समस्येचा त्रास होत असल्यास त्यावर सोपा उपाय म्हणजे व्हॅनिला आईस्क्रिम ! व्हॅनिला आईस्क्रिम हा कोल्ड मिल्कचाच एक प्रकार आहे. यामुळे नैसर्गिकरित्या अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी करण्यास फायदा होतो. मग पित्त आणि उकाडा दोन्हींवर रामबाण ठरणारा हा उपाय पहा कसा ठरतो फायदेशीर.  

कसे ठरते फायदेशीर ?

काही अभ्यासाच्या अहवालानुसार दुग्धजन्य पदार्थांमुळे पित्त वाढू शकते. मात्र दूध हे पूर्णअन्न आणि नैसर्गिक अ‍ॅन्टासिड म्हणून ओळखले जाते. त्यामुळे जेवणानंतर इतर काही गोडाचे पदार्थ खाल्ल्यास ते फायदेशीर ठरत नाहीत. दूधामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन घटकांचा मुबलक साठा असतो. दूधामुळे शरीरात अ‍ॅसिड साचून राहण्यास प्रतिबंध होतो. तसेच शरीरातील अतिरिक्त अ‍ॅसिड दूधात शोषले जाते. म्हणूनच जेवणानंतर कपभर व्हॅनिला आईस्क्रिम खाल्ल्यास पचन सुधारते आणि छातीत होणार्‍या जळजळीपासून आराम मिळण्यास मदत होते.

अन्न पोटात गेल्यानंतर डायजेस्टिव ज्युस (अन्नरस) पोषणद्रव्यांचे शोषण करण्यासाठी मदत करतात. अन्नाचे विघटन होऊन तयार होणारे रस अ‍ॅसिडीक असतात. ते पोटात राहणे आरोग्यासाठी उत्तम असते. मात्र पचनप्रक्रियेमध्ये काही  बिघाड झाल्यास ते पुन्हा तोंडाजवळ येतात हे अ‍ॅसिडीटीच्या लक्षणांमधून आपल्याला समजते.

ही लक्षणं आढळल्यास आपण अ‍ॅन्टासिड्स  घेतो.  यापुढे अ‍ॅसिडीटीचा त्रास वाटल्यास गोळ्या किंवा सिरप  घेण्यापेक्षा व्हेनिला आईस्क्रिमचा आस्वाद  घ्या. इतर आईस्क्रिमच्या तुलनेत व्हेनिला आईस्क्रिममध्ये साखरेचे प्रमाण आटोक्यात असते.  ‘ गर्भारपणाच्या दिवसात स्त्रियांना अ‍ॅसिडीटी किंवा हार्टबनचा त्रास होत  असल्यास गर्भवती स्त्रियादेखील कपभर व्हेनिला आईस्क्रिम  खाऊ शकतात.’ असा सल्ला एक्सपर्ट देतात. 

लक्षात ठेवा ही खास बाब  -  

व्हेनिला आईस्क्रिम हे घरगुती बनवलेले असल्यास तसेच त्यामध्ये आर्टिफिशिअल रंग, स्वादाचा अति वापर केलेले नसल्यास ते फायदेशीर ठरेल.