गुरुपौर्णिमा विशेष : वाकून नमस्कार करण्यामागे दडलीत '८' आरोग्यदायी रहस्य!

व्यासपौर्णिमा म्हणजेच  गुरूपौर्णिमा! 

Updated: Jul 27, 2018, 09:51 AM IST
गुरुपौर्णिमा विशेष : वाकून नमस्कार करण्यामागे दडलीत '८' आरोग्यदायी रहस्य! title=

मुंबई : व्यासपौर्णिमा म्हणजेच  गुरूपौर्णिमा ! प्रत्येकाच्या आयुष्यात आई, वडील आणि गुरूंना विशेष स्थान असते. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आशिर्वादानेच आपण जीवनात प्रगती करू शकतो. ज्ञानाचे उगमस्थान समजल्या जाणार्‍या महर्षी व्यास ऋषींचा जन्मदिवस हा व्यासपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यादिवशी गुरूस्थानी असलेल्या व्यक्तींचे आशीर्वाद घेतले जातात.

भारतीय परंपरेत वयाने, कर्तृत्त्वाने मोठ्या असलेल्या व्यक्तींना वाकून नमस्कार केला जातो. पण चरणस्पर्श करण्याच्या या रीतीमागेदेखील काही आरोग्यदायी रहस्य लपली आहेत. जाणून घेऊया...

अहंकार कमी होतो 

मोह, माया, यश, प्रगती याची भूरळ प्रत्येकालाच पडते. यामुळे स्वतःमध्ये आलेला ‘अहं’भाव आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्ती पुढे झुकल्याने कमी होतो.

पदहस्तासन

कंबरेत वाकून खाली वाकणे म्हणजेच 'पदहस्तासन.' हे एक योगासन असून यामुळे शरीराचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

आरोग्यदायी फायदे 

# हार्मस्ट्रिंग म्हणजेच गुडघ्याच्या मागच्या दोन्ही स्नायूंना जोडणारा बारीक स्नायू तसेच पोटर्‍यांच्या स्नायूंवर ताण येतो.

# पायांच्या बोटांपासून मेंदूपर्यंत होणारा रक्तप्रवाह सुधारतो.

# पोटाजवळील स्नायूंवर दाब आल्याने पचनाचे विकारही दूर राहतात.

# कमरेपासून सारे शरीर खाली झुकल्याने रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते परिणामी चेहर्‍यावरील कांती सुधारते.

# प्रामुख्याने  लहान मुलांनी नियमित या आसनाचा सराव केल्यास त्यांची उंची वाढण्यास मदत होते.

# शरीरातील रक्तप्रवाह सुधारल्याने डोकेदुखी व निद्रानाशाची समस्या कमी होते.

सकारात्मकता वाढते 

कंबरेत वाकून नमस्कार केल्यानंतर त्यावर मोठ्या व्यक्ती आशीर्वाद देतात. आशीर्वाद हा उन्नतीसाठी व चांगल्या भावनेने दिला जातो. त्यामुळे सहाजिकच तुम्हांला प्रसन्न व ताजेतवाने वाटण्यास मदत होते.
म्हणूनच तुमच्यापेक्षा कर्तृत्त्वाने, वयाने  मोठ्या असणार्‍या व्यक्तींना वाकून नमस्कार करा. 

वाकून  नमस्कार करण्याची योग्य पद्धत 

  • समोरच्या व्यक्तीप्रती आदर व्यक्त करण्यासाठी नमस्कार केला जातो. त्यामुळे
  • त्या व्यक्ती समोर उभे राहून कंबरेत पूर्ण वाकावे.
  • त्यानंतर त्यांच्या पायांच्या तळव्यांना स्पर्श करावा. (आजकाल नमस्कार करताना अनेकजण केवळ गुडघ्यांना स्पर्श करतात.)
  • त्यानंतर काही सेंकदांनी पुन्हा मूळ स्थितीत यावे.
  • याचसोबत आशीर्वाद देणार्‍या व्यक्तीनेदेखील विनम्रपणे थोडे झुकून त्यांना शुभाशिर्वाद द्यावा.