भाताच्या पाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे

अनेकदा आजारी असताना किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्हांला आईने पेज प्यायला दिली असेल. मात्र पेज हे केवळ आजारपणातले जेवण नाही. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Jan 29, 2018, 04:02 PM IST
भाताच्या पाण्याचे  5 आरोग्यदायी फायदे  title=

मुंबई : अनेकदा आजारी असताना किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्हांला आईने पेज प्यायला दिली असेल. मात्र पेज हे केवळ आजारपणातले जेवण नाही. 

नियमित धावपळीच्या दिवसांतदेखील  झटपट आणि हेल्दी नाश्ता म्हणून पेजेचा नक्कीच आहारात समावेश करू शकता

शरीराला उर्जा मिळते – 

भाताच्या पेजेमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते. या कार्बोहायड्रेसचे विघटन करून तुम्हांला तात्काळ उर्जा मिळण्यास मदत होते. त्यामुळे घरातून निघण्यापूर्वी पेजेचे पाणी पिऊन निघा. यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने रहाल. एनर्जी ड्रिंकप्रमाणे भाताचे पाणी काम करते. 

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो – 

भातामध्ये फायबर घटक पचनक्रियेला चालना देते. स्टार्च उपयुक्त बॅक्टेरियांची वाढ होण्यास मदत करते. परिणामी पोट साफ राहण्यास मदत होते.

डीहायड्रेशनचा धोका टळतो – 

उन्हाच्या तडाक्यामुळे अनेकदा शरीरातील पाण्याचा अंश कमी होण्याची शक्यता असते. अशावेळी पेजेचे पाणी पिणे उत्तम हेल्थ ड्रिंक आहे. घामामुळे शरीरातून मीठाचे प्रमाण कमी होते त्यामुळे पेजेचे पाणी घटणारी पोषणद्रव्य वाढवण्यास मदत करतात. पेजेमुळे शरीराची झीज भरून निघण्यास मदत होते.  

व्हायरल इंफेक्शनपासून बचाव होतो –  

व्हायरल इंफेक्शनमुळे तापाच्या किंवा उलट्यांच्या त्रासाने कमजोरी आल्यास जेवणाऐवजी पेज प्या. यामुळे आजारपण दूर करण्यास तसेच शरीरातील पोषणद्रव्यांची झीज भरून काढण्यास मदत होते. 

डायरियाचा त्रास कमी होतो –

 आबालवृद्धांमध्ये डायरियाच्या समस्येवर मात करण्याचा उत्तम घरगुती उपाय म्हणजे ‘ भाताची पेज’. लहान मुलांमध्ये डायरियाच्या समस्येवर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे रूपांतर गंभीर स्वरूपातील डीहायड्रेशनमध्ये होते. एका संशोधनानुसार भाताची पेज डायरियाच्या समस्येवर उत्तमरित्या मात करू शकते.

 
कशी बनवाल पेज – 

कपभर पेजेचे लाल तांदूळ ( उपलब्ध नसल्यास साधे तांदूळ) 3-4 कप पाण्यात उकळा. अर्धे कच्चे शिजल्यानंतर त्याचे पाणी गाळून घ्या. त्यात चवीपुरता मीठ घालून गरमगरम प्या. किंवा अगदी मऊ शिजवलेला पेजेचा भात त्या पाण्यासोबतच खा. भाताच्या पाण्यामध्ये चवीपुरता मीठ, काळामिरी, साजूक तूपदेखील मिसळू शकता. हे आरोग्याला अधिक फायदेशीर ठरते.