मुंबई : एप्रिलचा महिना अजून उजाडलाच नाही तर उन्हाच्या जबरदस्त झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाळ्यात तशी भूक कमीच लागते. काही खाण्याची इच्छा होत नाही. मात्र तहान फार लागते. अशावेळी कोल्ड ड्रिंक्स पिण्याचा मोह आवरता येत नाही. पण कोल्ड ड्रिंक्स प्यायल्यावर थोडा वेळ ठीक वाटते. परंतु, ते स्वास्थ्यासाठी नुकसानकारक ठरतात.
म्हणून कोल्ड डिंक्सऐवजी दुसेर थंड पदार्थ तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी काही हेल्दी पर्यायही आहेत. मग विचार कसला करताय? वेगवेगळ्या फळांनी हेल्दी मिल्कशेक बनवा. हे हेल्दी आणि टेस्टीही असते. हे शेक पिण्याचे कोणतेही नुकसान नाही.
हे शेक बनवण्यासाठी ताज्या सफरचंदाचा ज्युस, त्यात लिंबाचा रस, संत्र्याचा रस आणि साखर घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात थंड दूध आणि थोडेसे बर्फाचे तुकडे घालून मिक्सरमध्ये ब्लेंड करा. तुम्हाला हवे असल्यास त्यात थोडी आईसक्रीम आणि सुकामेवा घालू शकता.
कलिंगडाचे छोटे तुकडे करुन त्यात थंड दूध आणि साखर घाला. शेक तयार. तुम्ही थंडगार शेकचा आस्वाद घेऊ शकता.
केळं, आंबा, कलिंगड, सफरचंद आणि इतर फळे यांचे एकत्रितरित्या तुम्ही मॉकटेल बनवू शकता. यासाठी ही सर्व फळे कापून एकत्र करा. त्यात साखर आणि बर्फ घालून नीट मिक्स करा. त्यात थोडा लिंबाचा रस आणि आलं घाला. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यात सुकामेवा देखील घालू शकता.