Tongue cleaning Tips: आपण प्रत्येक जण आपल्या आरोग्यासाठी खूप जागृत असतो. दात आणि तोंडाची स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. आपण सर्वजण सकाळी दात घासून स्वच्छ करतो. पण नुसते दात स्वच्छ ठेवले म्हणजे संपूर्ण तोंड स्वच्छ होतं असं नाही. तोंडाच्या संपूर्ण स्वच्छतेसाठी, जीभेची साफसफाई करणेही महत्त्वाचं आहे. जीभ व्यवस्थित स्वच्छ न केल्यास श्वासाच्या दुर्गंधीपासून ते अनेक आजार होऊ शकतात. जीभ साफ न केल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. पण अनेकांना जीभ कशी स्वच्छ करावी हे माहीत नसते. आज आम्ही तुम्हाला जीभ स्वच्छ करण्याच्या टिप्स सांगत आहोत. (how to clean tongue at home and tongue cleaning tips)
घरच्या स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवणारं मीठ जीभ स्वच्छ करण्यासाठी उपयोगी ठरू शकतं. मीठ हा एक प्रकारचा नैसर्गिक स्क्रब आहे. जीभ स्वच्छ करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने गार्गल करा, त्यासोबत जीभेवर मीठ शिंपडून आणि टूथब्रशच्या मागील बाजूने स्क्रब करूनही जीभ स्वच्छ करता येते.
कोरफड ही एक अशी वनस्पती आहे, जी त्वचा, केस आणि आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण कोरफड वापरून तुम्ही तुमची जीभ स्वच्छ करू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? एलोवेरा जेलने जिभेचे डाग दूर होतात.
स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या हळदीनेही दात आणि जीभ स्वच्छ करता येतात. यासाठी जिभेवर हळद शिंपडा आणि ब्रशच्या मागील बाजूस स्क्रब करा. तुम्ही टंग क्लीनर देखील वापरू शकता. यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
दही खाण्याचे अनेक फायदे तुम्ही ऐकलेच असतील. पण तुम्हाला माहित आहे का की दह्याच्या वापराने जीभ साफ करता येते. दही हे प्रो-बायोटिक आहे. यामुळे जिभेवरील बुरशी, पांढरा थर आणि जिभेवर साचलेली घाण अशा सर्व समस्यांवर हे फायदेशीर आहे. यासाठी जिभेवर थोडे दही लावून तोंड चालवावे व नंतर पाण्याने धुवावे. असं केल्यानं जिभेची घाण नाहीशी होते.
जीभ स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा देखील वापरता येतो. यासाठी लिंबाच्या रसात थोडासा बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट बोटांच्या मदतीने जिभेवर लावा आणि चोळा. काही वेळाने पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे जिभेवरील पांढरा थर साफ होईल.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)