मुंबई : कोरोना सारख्या प्राणघातक विषाणुमुळे जगभरात धोक्याची घंटा देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली असून या संकटावर मात करण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना या आजाराचा धोका अधिक असल्याने अशा व्यक्तींनी स्वसंरक्षासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. बेराम पर्डीवाला यांनी सांगितले.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं कोरोनाला जागतिक आरोग्य संकट म्हणून घोषित केलं आहे. कोरोनाच्या या विषाणूचं शरीरात प्रवेश केल्यावर हा विषाणू शरीरात चिकटून बसतो. श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो.हा विषाणू सर्वांत आधी घशाच्या आसपासच्या पेशींना लक्ष्य करतो. त्यानंतर श्वसननलिका आणि फुफ्फुसांवर हल्ला चढवतो.
श्वसननलिका आणि फुफ्फुसांमध्ये कोरोना विषाणूंच्या संख्येत वाढ होते. या ठिकाणी तयार झालेले नवीन कोरोना विषाणू इतर पेशींवर हल्ला करतात. कोरोना या विषाणुचा एक प्रकार म्हणजे सार्स. सार्स प्रकारातील कोरोना विषाणु अत्यंत घातक मानला जातो.
कोरोना सारख्या घातक आजाराचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. मधुमेहींना या आजाराचा धोका जास्त असणे सहाजिक आहे कारण जे नियमितपणे औषधांचं सेवन करतात अशा रुग्णांमधील रोगप्रतिकारक पेशी कमकुवत होतात. आणि त्यामुळे त्यांचा चटकन आजार जडण्याची शक्यता असते.
कोरोनाव्हायरसची लागण झाल्यास मधुमेह असलेल्या लोकांमध्ये गंभीर लक्षणे आणि गुंतागुंत दिसून येतात. अशा प्रकारे, मधुमेहींनी योग्य काळजी घेतल्यास कोविड -19पासून होणारा आजार होण्याचा धोका टाळता येऊ शकतो.
जेव्हा मधुमेहाचे अचूक व्यवस्थापन केले जात नाही अशावेळी रक्तीतील साखरेच्या पातळीमध्ये चढ-उतार जाणवतो आणि त्यामुळे मधुमेहाशी संबंधित इतर गुंतागुंत होण्याचा धोका देखील वाढतो. म्हणूनच, मधुमेहासह हृदयरोग किंवा इतर गुंतागुंत झाल्यास कोरोनाव्हायरसची लागण होण्याची शक्यता वाढते.
• आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात रहा आणि घरच्या घरी तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवा. आपल्याकडे औषधे आणि इतर वस्तूंचा पुरेसा साठा असल्याची खात्री करून घ्या. आपणास चढ-उतार दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
• आपल्या रक्तातील साखरेची पातळी आणि तापमानाचे नियमित परिक्षण करा. हायड्रेटेड रहा आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ताजे फळे आणि भाज्या खा.
• सोशल डिस्टसिंगचे पालन करा. कोरोनाव्हायरस होण्याचा धोका कमी करू शकतो.
• शरीरात होणार्या बदलांकडे बारीक लक्ष द्या कारण ते संक्रमणाचे लक्षणही असू शकते.
• हॅंड सॅनिटायझरचा वापर करा – जेव्हा साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तेव्हा हॅंड सॅनिटायझरचा वापर करा. सॅनिटायझरचा अतिवापरही करू नका त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते.
• वैयक्तीक स्वच्छतेकडे लक्ष द्या – दैनंदिन कामांमध्ये स्वच्छतेकडे पुरेपुर लक्ष द्या. हातांची स्वच्छता राखा. साबणाचा वापर करून हात स्वच्छ धुवा त्याचबरोबर नखांची स्वच्छता राखा.
• सर्दी,खोकला किंवा ताप असल्यास बाहेर जाणे टाळा. खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर रुमाल ठेवा. गरचजेच्या वेळी मास्कचा वापर करा.
• स्वयंपाक करताना, जेवणापुर्वी तसेच वॉशरुमचा वापर केल्यावर हात स्वच्छ धुवा.