जाणून घ्या, जेवणानंतर लगेचच अंघोळ करणं कितपत योग्य?

जेवणानंतर अंघोळ करणं आरोग्यास नुकसानदायक ठरु शकतं.

Updated: Jul 19, 2020, 10:10 PM IST
जाणून घ्या, जेवणानंतर लगेचच अंघोळ करणं कितपत योग्य?  title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : काही लोकांना रात्री जेवणानंतर किंवा रात्री झोपायच्या आधी अंघोळ करायची सवय असते. त्याशिवाय लॉकडाऊनमध्ये घरातून काम करताना अनेकांच्या सवयींमध्येही चांगले-वाईट बदल झाले आहेत. अशात कधीही अंघोळ करणं किंवा अनेकदा जेवणानंतर अंघोळ करण्याची सवयही अनेकांना असते. पण जेवणानंतर अंघोळ करणं आरोग्यास नुकसानदायक ठरु शकतं.

नाश्ता, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच अंघोळ केल्यामुळे शरीराचं तापमान (Body Temperature) कमी होतं. अशा परिस्थितीत, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, हात, पाय, चेहरा यासारख्या शरीराच्या इतर भागात रक्त प्रवाह वाढतो. त्यामुळे शरीरात अस्वस्थता वाढते. त्याशिवाय पोटाच्या आस-पास असलेलं रक्त अन्न पचनासाठी मदत करतं. परंतु जेवणानंतर लगेच अंघोळ केल्यामुळे तापमान कमी झाल्याने, त्या तापमानात संतुलन साधण्यासाठी रक्त शरीराच्या इतर भागात वाहू लागते. यामुळे, अन्नपचन योग्यरित्या होत नाही किंवा पचण्यास जास्त वेळ लागतो.

गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचं तापमान कमी होण्यापासून बचाव होऊ शकतो, असा काहींचा समज असतो. परंतु हे देखील हानिकारक ठरु शकतं. जेवणानंतर लगेच कोमट पाण्याने आंघोळ केल्याने पोटाचं तापमान कमी होतं, अशा परिस्थितीत, रक्तप्रवाह पोट सोडून शरीराच्या इतर भागांमध्ये जातो. रक्तवाहिन्यांचं रक्त इतर कामांमध्ये वापरलं जातं आणि आपल्या मेंदुला पुरेसा रक्त पुरवठा न झाल्याने चक्कर येण्यासारखी समस्या उद्भवू शकते.

आयुर्वेदानुसार, जेवणानंतर शरीरात अग्नि तत्व सक्रिय होतं, त्यामुळे जेवण लवकर पचतं. जेवणानंतर लगेचच अंघोळ केल्याने, पोटाचं तापमान कमी होतं, त्यामुळे जेवण लवकर पचत नाही. त्यामुळे जेवणानंतर कमीत-कमी 1 तासापर्यंत अंघोळ करु नये. त्याशिवाय जेवणानंतर लगेच व्यायाम किंवा शारीरिक कामही शक्यतो करु नये.

जेवणानंतर लगेचच अंघोळ केल्यामुळे होणाऱ्या समस्या सर्वांनाच होत नाही. परंतु जे लोक अस्वस्थ असतात किंवा जे रक्तप्रवाहाच्या समस्येमुळे पीडित आहेत, त्यांनी याबाबत अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.