प्रदूषित हवेमुळे मधुमेहाचा धोका

चीनमध्ये मधुमेहाचे सर्वात अधिक रूग्ण आहेत.

Updated: Mar 13, 2019, 06:15 PM IST
प्रदूषित हवेमुळे मधुमेहाचा धोका

बीजिंग - अधिक काळ प्रदूषित हवेत श्वास घेतल्याने मधुमेहाचा खतरा वाढत असल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये नुकत्याच एका अभ्यासातून याबाबत माहिती समोर आली आहे. मधुमेहामुळे जगभरात आरोग्यासंबंधीही समस्या वाढत आहे. यामुळे आर्थिक ओझेही वाढत आहे. जगभरात चीनमध्ये मधुमेहाचे सर्वात अधिक रूग्ण आहेत. चीनमधील सरकारी एजन्सी शिन्हुआने केलेल्या अभ्यासातून विकसनशील देशांत वायू प्रदूषण आणि मधुमेहातील संबंधांबद्दलची माहिती दिली गेली आहे. 

पीएम २.५ हे कण वायू प्रदूषक असतात. या कणांच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो. पीएम २.५ डोळ्यांनाही न दिसणारे अतिसूक्ष्म कण असतात. या हानीकारक कणांच्या अधिक संपर्कात आल्यास मधुमेह होण्याची शक्यता असते. चायनीज अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस फुवई रूग्णालयाचे संशोधक आणि अमेरिकेतील एमरॉय विश्वविद्यालय यांनी केलेल्या एकत्रितपणे केलेल्या अभ्यासातून पीएम २.५च्या हानीकारक सूक्ष्म कणांच्या संपर्कात राहिल्याने मधुमेह होत असल्याचे सांगितले. चीनमधील ८८,०००हून अधिक चीनी प्रोढांच्या आकड्यांनुसार मधुमेहासंबंधी आकड्यांचे विश्लेषण केले आहे.

अधिक काळ पीएम २.५ च्या संख्येत मायक्रोग्राम प्रति घन मीटरपर्यंत वाढ झाल्याने मधुमेहाचा खतरा १५.७ टक्के वाढला आहे. हा अहवाल एन्व्हायरमेंट इंटरनेशनलमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. जगात वायू प्रदूषण ही अतिशय गंभीर समस्या झाली आहे. वातावरणातील सततच्या प्रदुषणाने नागरिकांना मोठ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. हवेतील न दिसणाऱ्या अतिसूक्ष्म विषारी कणांमुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.